Menstrual Leave Policy : निर्णय तसा चांगला ...!
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पगारी रजा देण्याचा निर्णय स्वागतार्ह
मनीषा सुभेदार/बेळगाव
महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक महिन्याला एक या प्रमाणे वर्षाला एकूण पगारी 12 रजा देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. ‘मेन्स्ट्रुअल लिव पॉलिसी-2025’ अंतर्गत महिलांना आता या रजांचा लाभ घेता येणार आहे. हा निर्णय लागू करण्याबाबत वर्षभरापासून चर्चा सुरुच होती. कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने याबाबत सरकारला निवेदनही दिले होते. चर्चेअंती कामगार मंत्री संतोष लाड यांनी या योजनेचा प्रस्ताव सरकारकडे मांडला होता. त्यावर गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाले. अपेक्षेप्रमाणे आता या निर्णयावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. एकीकडे या निर्णयाचे स्वागत करताना त्यातील तोटे किंवा त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता अधिक प्रमाणात दिसून येत आहे. वास्तविक मासिक पाळीमध्ये महिलांना विश्रांतीची गरज असते. त्यामुळे एक दिवस जरी विश्रांती मिळाली तरीही पुरेसे आहे, असा एक मतप्रवाह आहे. मात्र, आम्हाला अशा सवलतीचा लाभ न मिळता सुद्धा आम्ही नोकरी केली. अशी एक खंतसुद्धा व्यक्त होत आहे. अनेक डॉक्टर्सना सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह वाटतो. मात्र त्याचवेळी काही जणांनी याचा दुरुपयोग होण्याची शक्यता स्पष्टपणे व्यक्त केली.
काम करणाऱ्या महिलांसाठी निर्णय फायदेशीर
दोन कारणांमुळे महिलेला मासिक पाळीच्या काळात सुटीची गरज भासू शकते. एक म्हणजे तीव्र वेदना (ज्याला डिस्मेनोरिया म्हणतात) आणि दुसरे म्हणजे मूड बदल किंवा चिडचीड (ज्याला प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात) होत.s तेव्हा भारतामधील अभ्यासानुसार 12 ते 22 टक्के महिलांना मासिक पाळीच्या तीव्र वेदना होतात. ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. एकूणच डिस्मेनोरिया बहुतांश महिलांमध्ये आढळतो व निम्याहून अधिक महिलांना पीएमएस आणि मूड स्विंगचा त्रास होतो. हा निर्णय महिला कामगारांसाठी उपयुक्त असला तरी त्याबाबत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एकत्रित पाहता यामुळे कामाचे अनेक तास वाया जाण्याची शक्यता आहे. अभ्यासानुसार 50 टक्क्यांहून अधिक महिलांना कोणतीही लक्षणे नसतात व त्यांना सुटीची गरज भासत नाही. काम करणाऱ्या महिलांसाठी हा निर्णय फायदेशीर असला तरी त्यांना कामावर नेमणाऱ्या संस्थेसाठी तो अडचणीचा ठरेल व नजीकच्या काळात महिलांना काही नोकऱ्यांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
-डॉ. नीता देशपांडे, मधुमेह तज्ञ व सेंट्राकेअरच्या संचालक
‘त्या’ दिवसामध्ये महिलेला विश्रांतीची नितांत गरज
सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. या दिवसामध्ये महिलेला विश्रांतीची नितांत गरज असते. कारण तिची काम करण्याची क्षमता काही प्रमाणात कमी होते. तिला विश्रांती मिळाली तर दुसरे दिवशी ती अधिक उत्साहाने काम करू शकेल. परिणामी तिचे काम अधिक उत्तम होईल. तथापि, प्रत्येक महिलेला त्रास होतोच असे नाही. परंतु अधिक विचार करता कोणत्याही कामाच्या ठिकाणी महिला अधिक संख्येने असल्यास त्याचा कामांवर परिणाम होईल व महिलांना नोकरी देताना प्रामुख्याने या गोष्टीचा विचार करून त्यांना नोकऱ्या नाकारल्या जातील. विद्यार्थिनींच्या बाबतीत विचारता त्या म्हणाल्या, विद्यार्थिनींना इतका त्रास होत नाही. तसे ही त्या एखादा दिवस वर्ग चुकवतात. परंतु शाळांनी हा निर्णय राबविण्याचे ठरल्यास संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत होईल. एका दिवशी 10 विद्यार्थिनी येऊ शकल्या नाहीत तर पूर्ण वर्गावर त्याचा विपरीत परिणाम होईल. त्यामुळे विद्यार्थिनीसाठी अशा सुटीची सद्यस्थितीत आवश्यकता नाही.
-डॉ. रागिणी भट (सौभाग्या) - स्त्री रोग तज्ञ व ओबीजी सदस्य
रजा महिलांसाठी आवश्यक बाब
सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. महिलांना त्या ठराविक काळात विश्रांतीची गरज असते.महिलांची कितीही प्रगती झाली तरी आजही अनेक ठिकाणी महिला मोकळेपणाने आपल्या व्यथा किंवा दुखणी सांगू शकत नाहीत. अनेक ठिकाणी स्वच्छता गृहाचाही अभाव असतो. शिवाय पेरीमेनोपॉज दरम्यान महिलांची खूप गैरसोय हेते. त्यामुळे अशी रजा मिळाल्यास महिलांसाठी ती आवश्यक बाब आहे.
-डॉ. सोनल धामणकर- स्त्री रोग तज्ञ
सरकारने नियम केल्यास रजा देणे भाग
सरकारने जर नियम केला तर अशी रजा देणे भाग आहे. त्यामुळे कोणी रजा मागितली तर मी नक्की देईन. परंतु वैयक्तिक दृष्ट्या मला असे वाटते की, काही काही गोष्टांचे खासगीपण खासगीच राहिलेले बरे असते. ही गोष्ट चर्चेमध्ये आणण्याची फारशी गरज नाही. बाई स्वत:च आपली ही खासगी बाब जाहीर करण्यास उत्सुक असेल असे वाटत नाही. शिवाय प्रत्येक महिलेला त्रास होतोच असे नाही ज्यांना समस्या जाणवते त्या तशाही ‘सीक लिव्ह’ घेऊ शकतात. अन्य रजासुद्धा आहेतच. शिवाय जर प्रत्येक ऑफिसमध्ये स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशीन व वेदनाशामक गोळ्या उपलब्ध झाल्या तर सुटीची गरजच भासणार नाही. अर्थात नियम केला तर त्याचे पालन आम्ही नक्की करू.
-डॉ. आसावरी संत- पॅथॉलॉजिस्ट
सर्वसाधारण रजेऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’ पर्याय अधिक व्यावहारिक
महिलांच्या आरोग्याशी निगडित मासिक पाळी हा अत्यंत संवेदनशील आणि वास्तव विषय आहे. या काळात महिलांना आराम, सन्मान आणि सहानुभूती मिळावी ही अत्यंत स्वागतार्ह आणि मानवी दृष्टिकोनातून योग्य भूमिका आहे. सरकारने महिलांच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता दाखवली हे निश्चितच कौतुकास्पद आहे. पण त्याचवेळी या धोरणाची अंमलबजावणी संतुलित पद्धतीने व्हावी ही देखील गरज आहे. केवळ वेगळे नियम तयार करून महिलांना ‘कमकुवत’ ठरवणे योग्य ठरणार नाही. सर्वसाधारण रजेऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा लवचिक वेळापत्रक यासारखे पर्याय अधिक व्यावहारिक ठरू शकतात. याचा गैरवापर होऊ नये. महिलांना सक्षमीकरण देणे म्हणजे त्यांना वेगळे करणे नव्हे, तर त्यांना समान संधी, सन्मान आणि सुविधा देणे होय. भारताला पुढे नेण्यासाठी आपल्याला सहानुभूती आणि समानता दोन्ही गरजेच्या आहेत. दिखाऊपणा नव्हे, तर खऱ्या अर्थाने सशक्त महिला हव्या आहेत.
- सोनाली सरनोबत
निर्णयाचा दुरुपयोग करू नये
हा निर्णय महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वागतार्ह असला तरी त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता अधिक आहे. जर रविवारला धरून सोमवारसाठी सुटी हवी असेल तर हे कारण पुढे केले जाईल. हे कारण असे आहे की, सहजपणे त्याची शहानिशाही करता येणार नाही. शिवाय मेनोपॉज आला असला तरी ते सत्य दडवून ठेवून सुटीचा लाभ उठविण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांना विश्रांतीची गरज नक्कीच आहे. केवळ मासिक पाळीच्या काळातच नव्हे तर आठवड्यातून एक दिवस महिलांना विश्रांतीची गरज असते. दुर्दैवाने आपल्याकडे तिला गृहीत धरले गेल्याने त्याचा विचार होत नाही.
संवादाचा अभाव हे मानसिक अन् आरोग्याचे कारण
संस्थेतील शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांचा विचार करून यापूर्वीच आम्ही वेंडिंग मशीन सुरू केले आहे. शिवाय विनामूल्य सॅनिटरी पॅड्स देत आहोत महिलांचा विचार करून सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.
-राजश्री हलगेकर-मराठा मंडळ अध्यक्ष
शरीराला विश्रांतीची गरज निश्चितच
हा निर्णय चांगला आहे. महिलांना विश्रांतीची गरज निश्चितच असते. काहींना वेदना होतात तर काहीना होत नाहीत. तथापि या दिवसात शरीराला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे सुटी मिळाल्यास ते स्वागतार्हच आहे.
-डॉ. अनिता दलाल- स्त्री रोगतज्ञ, केएलई हॉस्पिटल