For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिक्रमण हटाव मागणीसाठी कंग्राळी खुर्दमध्ये रास्ता रोको

12:19 PM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
अतिक्रमण हटाव मागणीसाठी कंग्राळी खुर्दमध्ये रास्ता रोको
Advertisement

ग्राम पंचायतीने तातडीने कारवाई करण्याची मागणी : रहिवाशांचे ठिय्या आंदोलन

Advertisement

बेळगाव : रामदेव गल्ली, कंग्राळी खुर्द येथील रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केल्याने संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही वेळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रास्ता रोकोची माहिती समजताच ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य व पीडीओंनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. त्याचबरोबर अतिक्रमण करण्यात आलेल्या ठिकाणी भेट देऊन संबंधित अतिक्रमण हटवण्यासाठी तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले.

कंग्राळी खुर्द येथील रामदेव गल्लीच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर नवीन गटारी देखील बांधल्या जात आहेत. गल्लीच्या शेवटी असलेल्या एका घरमालकाने रस्त्यावर अतक्रिमण करून संरक्षण भिंत बांधली आहे. त्यामुळे रस्ता निमुळता बनला आहे. खरेतर सदर रस्ता 18 फूट रुंदींचा होणे गरजेचे आहे. मात्र, स्थानिक रहिवाशांनी 16 फूट रस्ता करण्यास होकार दिला होता. अतिक्रमण करण्यात आलेल्या ठिकाणी वाहनांना वळण घेणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून 16 फूट रस्ता करण्यात यावा, अशी मागणी गल्लीतील रहिवाशांकडून केली जात आहे.

Advertisement

यापूर्वी अनेकवेळा मोजणी देखील केली आहे. रस्त्यावर अतिक्रमण करून संरक्षण भिंत बांधल्याचे मोजणीत स्पष्ट झाले आहे. पण सदर अतिक्रमण हटविण्याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. जाणूनबुजून कारवाई करण्याकडे चालढकल सुरू असल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी संतप्त रहिवाशांनी सदर अतिक्रमण हटवण्यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी पीडीओ व पंचायत सदस्यांनी कारवाई केली जाईल, असे सांगून रहिवाशांची बोळवण केली होती.  त्यातच गल्लीतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे.

जोपर्यंत अतिक्रमण हटविले जात नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम करण्यात येऊ नये, अशी मागणी करत शुक्रवारी पुन्हा गल्लीतील रहिवाशांनी कंग्राळीचा मुख्य रस्ता अडवून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची झळ पोहोचताच पीडीओ व सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संतप्त नागरिकांची समजूत काढली. आंदोलनाची माहिती समजताच एपीएमसी पोलिसांनी देखील धाव घेतली. तातडीने अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केल्याने अधिवेशन संपेपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, त्यानंतर योग्य ती कारवाई करू, असे पोलिसांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत रस्त्याचे काम करूयेऊ नये, अशी मागणी करण्यात आली. पण ठेकेदाराने रस्त्याचे काम अडवू नये, अशी विनंती केल्याने रस्त्याचे काम सुरू ठेवले. न्यायदान कमिटी व पीडीओकडून तातडीने अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर संतप्त रहिवासी शांत झाले.

Advertisement
Tags :

.