मुर्डेश्वर समुद्रात बुडालेल्या मृतांची संख्या आता चार
घटनेला जबाबदार मुख्याध्यापिकेसह सहा जणांना सेवेतून निलंबित : मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत-मुख्यमंत्र्यांकडून जाहीर
कारवार : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुर्डेश्वर येथे समुद्रात बुडून जीव गमविलेल्या शालेय विद्यार्थिनींची संख्या आता चार इतकी झाली आहे. मंगळवारी समुद्रात बुडालेल्या श्रावंती (वय 15) नावाच्या विद्यार्थिनीचा मृतदेह हाती लागला होता. तर बुडून बेपत्ता झालेल्या दिक्षा (वय 15), लावण्या (वय 15) आणि वंदना (वय 15) या विद्यार्थिनींचे मृतदेह बुधवारी हाती लागले. यापैकी दोन विद्यार्थिनींचे मृतदेह नवीन बीच रिसॉर्टजवळ तर अन्य एका विद्यार्थिनीचा मृतदेह अळवेकोडी येथे आढळून आला आहे. यशोदा, वक्षिणा आणि लितिका या तीन विद्यार्थिनी बुडत असताना घटनास्थळी धाव घेवून जीवरक्षकांनी वाचविले आहे. वाचविण्यात आलेल्या विद्यार्थिनींवर मुर्डेश्वर येथील आर. एन. शेट्टी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, मुर्डेश्वर दुर्घटना प्रकरणी मुर्डेश्वर पोलिसांनी स्वंयप्रेरीत शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला (वय 40), सुनील आर. (वय 33), चौडप्पा (वय 34), विश्वनाथ एस. (वय 27), शारदम्मा सी. एस. (वय 37) आणि सुरेश के. (वय 30) अशा एकूण सहा शिक्षकांवर प्रकरण दाखल केले आहे.
या प्रकरणी मुख्याध्यापिका शशिकला यांच्यावर अक्षम्य दुर्लक्षाचा ठपका ठेवून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मयत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया आणि जिल्हा पोलीस प्रमुख एम. नारायण हे मुर्डेश्वर येथे तळ ठोकून आहेत. मच्छीमारी आणि बंदर खात्याचे व जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांनी विद्यार्थिनी उपचार घेत असलेल्या शेट्टी रुग्णालयाला भेट दिली व विद्यार्थिनींच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली व त्यांना धीर दिला.
या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, कोलार जिल्ह्यातील मुळेबागीलु येथील मोरारजी देसाई रेसीडेन्सीयल स्कूलचे 47 विद्यार्थी पर्यटनासाठी मुर्डेश्वर येथे दाखल झाले होते. याममध्ये 19 विद्यार्थिनींचा आणि 27 मुलांचा समावेश होता. शाळेच्या मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षिका आणि चार पुरुष शिक्षक विद्यार्थ्यांसोबत होते. देवदर्शनानंतर हे विद्यार्थी समुद्रात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी उतरले होते. त्यावेळी समुद्राच्या लाटांच्या विळख्dयात सापडलेले सात विद्यार्थी खोल समुद्रात खेचले गेले. यापैकी एका विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू झाला. तीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्या होत्या. इतर अन्य तीन विद्यार्थिनींना वाचविण्यात आले होते. बेपत्ता झालल्या तीन विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी किनारपट्टी सुरक्षा दल जीवरक्षक आणि स्थानिक मच्छिमारांचा समावेश असलेल्या तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी या पथकांना बेपत्ता मुलींचा शोध लावण्यात यश आले.
शिक्षिका आणि जिल्हा प्रशासन दुर्घटनेला जबाबदार
या दुर्घटनेला शिक्षकवर्ग आणि जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले जात आहे. 15 वर्षाच्या वयोगटातील मुलींना कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता शिक्षकवर्गाने त्यांना समुद्राच्या पाण्यात जाऊ कसे दिले? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या घटनेला शिक्षकवर्गाचे अक्षम्य दुर्लक्ष जबाबदार असल्याने त्यांच्यावर मुर्डेश्वर पोलिसांनी स्वंयप्रेरणेने प्रकरण दाखल केले आहे.
पाच जणांना सेवेतून निलंबित
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. मृत विद्यार्थिनींचे मृतदेह त्यांच्या जन्मगावी पाठविण्याची सूचना केली आहे. अतिथी प्राध्यापक चौडाप्पा, शारदाम्मा, नरेश, सुनील, विश्वनाथ आणि लकम्मा यांना सेवेतून हटविण्यात आले आहे. ही कारवाई कर्नाटक निवासी शिक्षण संस्थांच्या संघाचे कार्यानिर्वाहक संचालक कांतराजू यांनी केली आहे.