सर्वात वृद्ध ‘आळशा’चा मृत्यू
गिनिज विक्रमपुस्तिकेत एका अद्भूत विक्रमांची नोंद नुकतीच करण्यात आली आहे. ती एका ‘आळशा’च्या मृत्यूसंबंधीची आहे. हा ‘आळशी’, त्याचा मृत्यू झाला तेव्हा 54 वर्षांचा होता. आता 54 वर्षे हे विक्रमी वय कसे असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. पण हे वय कोणत्याही आळशी माणसाचे नसून ते ‘स्लोथ’ किंवा आळशी प्राण्याचे आहे. त्याचे नुकतेच जर्मनीच्या प्राणीसंग्रहालयात निधन झाले. या प्रजातीतील प्राण्यांचे सरासरी वय 40 वर्षे असते. मात्र हा ‘स्लोथ’ 54 वर्षे जगला. त्यामुळे हा त्या प्रजातीसाठी जगण्याचा विक्रमच होता.
गिनीज विक्रम पुस्तिकेत त्याची जीवनगाथाही संक्षिप्तरित्या देण्यात आली आहे. आपल्या आयुष्यात त्याने या प्रजातीच्या 22 पिलांचे पितृत्व पत्करले. ही स्लोथ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या 22 पिलांचे महत्व या प्रजातीचे अस्तित्व टिकविण्यासाठी मोलाचे आहे. हा प्राणी सर्वसाधारणपणे झाडावर राहतो. तो थंड प्रदेशात आढळतो. तो अत्यंत आळशी म्हणून प्रसिद्ध आहे. झाडांवर राहणारे इतर प्राणी अत्यंत चपळ आणि वेगाने हालचाली करणारे असतात. तथापि या प्राण्याची तऱ्हा याच्या अगदी उलट आहे. त्याच्या आळशीपणामुळेच त्याची शिकारही मोठ्या प्रमाणात झाली आणि तो नामशेष होण्याच्या मार्गावर गेला. मात्र, जर्मनीच्या या प्राणीसंग्रहालयात आता या प्रजातीची संख्या समाधानकारक असून यात या स्लोथचे योगदान महत्वाचे आहे. म्हणूनच त्याची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली असून गिनीज विक्रमपुस्तिकेत त्याला स्थान देण्यात आले आहे. हा प्राणी ज्या देशांमध्ये आढळतो, तेथे त्याला जगविण्याचे आणि नामशेष होण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.