जगात कोठेही निर्दोष नागरिकांचा मृत्यू निंदनीय
जी-20 व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगात कोणत्याही संघर्षात निर्दोष नागरिकांचा मृत्यू होत असेल तर तो निंदनीयच आहे, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गुरुवारी ते जी-20 व्हर्च्युअल शिखर परिषदेच्या समाप्ती समारंभात भाषण करीत होते. भारताच्या नेतृत्वात ही या परिषदेची अंतिम बैठक होती. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण गोलार्ध देशांच्या एकजुटीचा मुद्दा जोरदारपणे मांडला.
नोव्हेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत या परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळाली होती. आता हे नेतृत्व ब्राझिलकडे हस्तांतरीत होत आहे. या हस्तांतरणापूर्वीची ही अखेरची शिखर परिषद होती. या परिषदेत सर्व सदस्य आणि आमंत्रित देशांचे प्रमुख ऑनलाईन सहभागी झाले होते.
इस्रायल-हमास युद्धावर चर्चा
या परिषदेत सध्या होत असलेल्या इस्रायल-हमास संघर्षावर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या संघर्षासंबंधी आपली मते स्पष्टपणे मांडली. या संघर्षात अधिक व्यापक स्वरुप धारण करु नये. हा संघर्ष चिघळल्यास पश्चिम आशिया क्षेत्राची सर्व प्रकारची हानी होऊ शकते. या क्षेत्रातील अस्थिरता अणि असुरक्षा हा आमच्या सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, हे आपल्या विविध विषयांवरच्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. शांतता हा आपल्या सर्वांच्या एकत्र येण्याचा पाया आहे, अशी मांडणी त्यांनी केली.
दहशतवाद केव्हाही अस्वीकारार्ह
जगात कोठेही आणि कोणत्याही कारणास्तव होणारा दहशतवाद निंदनीय आणि अस्वीकारार्हच आहे. सर्व देशांनी दहशतवादाचे संकट स्थायी पद्धतीने संपवण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही निमित्ताने दहशतवादाचे समर्थन केले जाऊ नये. तसेच त्यासंदर्भात सौम्य धारणाही असू नये, असे मत त्यांनी ठामपणे मांडले.
महिला सशक्तीकरण
या परिषदेने महिला सशक्तीकरणासाठी एक कार्यगट स्थापन केला आहे. महिला सशक्तीकरणात भारताने मोठी झेप घेतली असून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के स्थाने आरक्षित करण्याचा प्रस्ताव भारताच्या सरकारने संमत करुन घेतला आहे, हे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
दक्षिण गोलार्धाची क्षमता
पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील देशांची एकजूट त्यांच्या आणि जगाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. या देशांच्या क्षमतांकडे आजवर दुर्लक्ष झाले असले तरी आता या देशांनी एकत्रितरित्या आपले अस्तित्व जगाच्या दृष्टीस आणावयास हवे. दक्षिण गोलार्धातील देशांना एकत्र करण्याची प्रक्रिया अवघड आहे. अनेक अडथळे या कार्यात आहेत. तथापि, हे साध्य होण्यासारखे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जी-20 बहुपक्षीयतेवर भर दिला आहे. तो प्रगतीसाठी साधक असून या परिषदेकडून त्यासंबंधी अधिक अपेक्षा असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा दुरुपयोग धोकादायक
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा दुरुपयोग आणि डीपफेकसारखे प्रयोग मानवतेसाठी धोकादायक आहेत. याची साऱ्या जगाने जाणीव ठेवावयास हवी. या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितरित्या प्रयत्न करावयास हवेत. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रालाही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्राधान्य द्यावयास हवे. ही सर्व आव्हाने जी-20 परिषदेसमोर असून परिषद ती यशस्वीरित्या पेलून दाखवेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला आहे.
जी-20 परिषदेसमोर मोठी आव्हाने
ड पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जी-20 परिषदेच्या आजवरच्या कार्याचा आढावा
ड महिला सशक्तीकरण, कृत्रिम बुद्धीमत्तेसह अनेक मुद्द्यांवर केली मते व्यक्त
ड दशहतवादाचा नायनाट करण्यासाठी सारे जग एकत्र होण्याची आवश्यकता