समुद्रात बुडून गोंधळी गल्लीतील युवकाचा मृत्यू
शिरोडा-वेळागर येथील घटना : श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता : परिसरात हळहळ
वेंगुर्ले, बेळगाव : शिरोडा, वेळागर येथील समुद्राच्या पाण्यात बुडून गोंधळी गल्ली येथील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली असून तो युवक श्रीराम सेना हिंदुस्थानचा आघाडीचा कार्यकर्ता होता. त्याच्या अकाली मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. विनायक ऊर्फ पप्पू रमेश शिंदे (वय 44) रा. गोंधळी गल्ली असे त्याचे नाव आहे. शिरोडा, वेळागर येथील समुद्रात रविवारी तो आंघोळीसाठी उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. रविवार दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
विनायकच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सध्या दिवाळीची सुटी असल्यामुळे विनायक आपल्या मित्रांसमवेत पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेला होता. रविवारी सकाळी शिरोडा, वेळागर येथील बीचवर बेळगाव येथील पर्यटक पोहोचले होते. समुद्राच्या लाटा पाहून हे सर्वजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले. विनायक हा पाण्याच्या प्रवाहामुळे पुढे गेला. समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावरच बुडून त्याचा मृत्यू झाला. वृत्तपत्रविक्रेताही असणारा विनायक श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता होता. कोरोनाच्या काळात या युवकाने आपला जीव धोक्यात घालून समाजकार्य केले होते. रविवारी रात्री विनायक यांचा मृतदेह बेळगावला पोहोचला आहे. सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वा. सदाशिवनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
15 कार्यकर्ते गेले होते पर्यटनाला
उपलब्ध माहितीनुसार गोंधळी गल्ली व गांधीनगर परिसरातील सुमारे 15 कार्यकर्ते शनिवारी पर्यटनासाठी शिरोड्याला गेले होते. शनिवारी मुक्काम करून रविवारी सकाळी ते बीचवर पोहोचले होते. यातील काही जण किनाऱ्यावर व्हॉलिबॉल खेळत होते तर काही जण समुद्रात आंघोळीचा आनंद लुटत होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विनायकला पाण्याबाहेर काढून तातडीने शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक योगेश राठोड, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश कुबल, हेड कॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर, योगेश राऊळ, वाहतूक हवालदार मनोज परुळेकर आदी घटनास्थळी दाखल झाले. विनायकचा मित्र सूरज देवगेकर यांनी स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली.