नातवाला पाहण्यासाठी जाताना आजोबावर काळाचा घाला
यमकनमर्डी राम धाब्याजवळ घटना
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
जरळी (ता. गडहिंग्लज) येथे मुलगी प्रसूत झाल्यामुळे नातवाला पाहण्यासाठी जात असताना यमकनमर्डी राम धाब्याजवळील सर्व्हिस रस्त्यावर कंटेनरने अॅक्टीव्हा दुचाकीला धडक दिल्यामुळे अवजड कंटेनरच्या चाकाखाली सापडून कंग्राळी बुद्रुकच्या नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. शंकर हणमंत पाटील (वय 61) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी 9.40 वाजता घडली असून ऐन दिवाळीमध्ये अशी घटना घडल्यामुळे कंग्राळी बुद्रुक गाव शोकसागरात बुडाले असून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती अशी की, शंकर पाटील यांनी मुलगीचे जरळी (ता. गडहिंग्लज) येथे लग्न लावून दिले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी मुलगी प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले.
यामुळे नातवाला पाहण्यासाठी शंकर हे शनिवारी सकाळी 8 वाजता कंग्राळी बुद्रुक येथून जरळी गावाकडे आपल्या केए 22 ईआर 8303 या अॅक्टीव्हा होंडा दुचाकीवरुन निघाले. यमकनमर्डी सर्व्हिस रस्त्यावरील राम धाब्याजवळ ते आले असता एचआर 73 बी 2390 या अवजड कंटेनरने पाठीमागून त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे शंकर पाटील हे रस्त्यावर कोसळले आणि कंटेनर त्यांच्या डोक्यावरुन गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी यमकनमर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापिरी व पोलीस उपनिरीक्षक एम. के. मुगळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी यमकनमर्डी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविला. शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शंकर पाटील यांचा पुतण्या गोपाळ गणपत पाटील याने काका तुम्ही जरळीला पोहोचला का म्हणून फोन केला. तेव्हा फोन यमकनमर्डी पोलिसांनी उचलला तेव्हा तुम्ही कोठून व कोण बोलता असे विचारल्यावर कंग्राळी बुद्रुक गावचे असल्याचे समजल. तेव्हा पोलिसांनी शंकर पाटील यांचा यमकनमर्डी राम धाब्याजवळ सर्व्हिस रस्त्यावर अपघात झाला असून कंटेनरचे चाक शंकरच्या डोक्यावरुन गेल्यामुळे ते जागीच मृत्यू पावल्याचे सांगितले. शनिवारी सायंकाळी 7 वाजता कंग्राळी बुद्रुक येथील स्मशानभूमीमध्ये शंकर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ, भावजयी असा परिवार आहे. महानगरपालिका क्लास वन कंत्राटदार अशोक हणमंत पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.
नातवाचे तोंड पहाणे राहिले अधुरे
शंकर पाटील हे जरळीला आपली मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगा झाल्यामुळे नातवाचे तोंड पाहण्यासाठी ते शनिवारी सकाळी 8 वाजता कंग्राळी बुद्रुक येथून जरळीकडे आपल्या अॅक्टीव्हा होंडा दुचाकीवरुन चालले होते. परंतु यमकनमर्डी राम धाब्याजवळ अवजड कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अन् त्यांचे नातवाचे तोंड पहाणे अधुरे राहिले.