स्वयंरोजगार योजनांची अंतिम मुदत वाढवून द्यावी
चलवादी समाजाची मागणी, समाज कल्याण खात्याकडे निवेदन
बेळगाव : डॉ. बी. आर. आंबेडकर महामंडळातर्फे स्वयंरोजगार अर्ज करण्याच्या ऑनलाईन अर्जाची तारीख वाढवून द्यावी अशी मागणी बेळगाव जिल्हा चलवादी महासभेतर्फे केली आहे. याबाबतचे निवेदन समाज कल्याण खात्याच्या मंत्र्यांच्या नावाने जिल्हा समाज कल्याण खात्याकडे सुपूर्द केले आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर निगम नियमिततर्फे स्वयंरोजगार, जमीन मालकी योजना, गंगा कल्याण योजना, सुक्ष्म कर्ज प्रोत्साहन योजना, ऐरावत योजना, समृद्धी योजना आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी 10 ऑक्टोबर अखेरची तारीख देण्यात आली होती.
मात्र सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे ऑनलाईन अर्ज करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी अंतिम तारीख वाढवून द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात चलवादी समाजाची संख्या अधिक आहे. शिवाय समाजात बेरोजगार युवकांची संख्याही मोठी आहे. त्यांना स्वयंरोजगारसाठी या योजना गरजेच्या आहेत. यासाठी त्या योजनांची अंतिम तारीख वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष दुर्गेश मेत्री, परशराम कांबळे, कृष्णा कांबळे, भरमा कांबळे, आनंद कांबळे, संजू कोलकार आदी उपस्थित होते.