तुळशी जलाशयाच्या पायथ्याशी सापडला कांबळवाडीच्या इसमाचा मृतदेह
धामोड / वार्ताहर
धामोड ( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयाच्या पायथ्याशी कृष्णात शिवाजी मांढरेकर (वय ४६ रा. कांबळवाडी ) या मध्यमवर्गीय इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. अधिक तपास राधानगरी पोलीस करीत आहेत.
याबाबत राधानगरी पोलीस व घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की तुळशी जलाशयाच्या पायथ्याशी असणाऱ्या वनराईमध्ये गुरे चारण्यासाठी एक ग्रामस्थ गेला असता त्याला सडलेल्या अवस्थेत एका मध्यमवर्गीय इसमाचा मृतदेह आढळून आला .सदरची घटना त्याने पोलीस पाटील के डी इंगवले यांना सांगितली . त्यानंतर राधानगरी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली . दरम्यान हा मृतदेह कांबळवाडी येथील कृष्णात शिवाजी मांढरेकर यांचा असल्याचे कपडे व इतर वस्तू पहाता सकृतदर्शनी निष्पन्न झाले .सदरचा इसम गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असल्याचे व व्यसनाधित असल्याचे समजते. मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही . त्याच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे ,आई वडील , असा परिवार आहे.अधिक तपास राधानगरी पोलीस करीत आहेत.