डोळे दीपवणारा ‘जगन पॅलेस’
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘शीशमहाल’बद्दलच्या चर्चा सुरू असतानाच आता आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आलिशान राजवाड्याबद्दलच्या चर्चा रंगतदारपणे सुरू आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणममधील ऋषिकाँडा टेकडीवर समुद्रकिनाऱ्यावर एक मोठा बंगला बांधला आहे. याची अंदाजे किंमत सुमारे 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ही हवेली दहा एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरली असून त्यात चार मोठे ब्लॉक बनविण्यात आले आहेत. सर्व ब्लॉक्स अत्याधुनिक सुविधा आणि आकर्षक डिझाईनसह बांधण्यात आले आहेत. या हवेलीची रचना आणि डिझाईन कोणाचेही डोळे दीपवणारी अशीच आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नवीन निवासस्थानाचे नाव भाजपने ‘शीशमहाल’ असे ठेवले आहे. अलिकडेच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत हा सर्वात मोठा मुद्दा राहिला. याचा परिणाम असा झाला की केजरीवाल स्वत: आपली जागा वाचवू शकले नाहीत. आम आदमी पार्टीने दिल्लीचे तख्त गमावल्यानंतर ‘शीशमहाल’ची चर्चा शमत असतानाच आता आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या बंगल्याची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. या बंगल्याचे बांधकाम सुरू झाल्यापासून ते चर्चेचे केंद्र होते. ते बनविल्यानंतरही त्यावर बरीच चर्चा झाली. आता या बंगल्यातील आतील छायाचित्रे समोर आल्यानंतर हा बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दहा एकरवर उभारलेल्या या बंगल्यात दिसणाऱ्या लक्झरी वस्तू मनाला भिडणाऱ्या आहेत. दारांवरील कोरीव काम असो किंवा भिंती, झुंबर असो किंवा चहाचे टेबल असो किंवा संगमरवरी, येथील प्रत्येक वस्तू आलिशान राजवाड्याची अनुभूती देणारी आहे.
‘जगन पॅलेस’ची अंतर्गत रचना
आंध्रप्रदेशात सरकार बदलल्यानंतर माजी मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रे•ाr सध्या आलिशान राजवाड्यामुळे चर्चेत आहेत. या राजवाड्याला ‘जगन पॅलेस’ किंवा ‘जगन महाल’ म्हणून ओळखले जाते. त्याची भव्यता पाहून कोणीही थक्क होऊन जाईल. ‘जगन पॅलेस’मध्ये अनेक अत्याधुनिक आणि सुपर लक्झरी सुविधा आहेत. या राजवाड्यात 12 आलिशान बेडरुम असून त्यात आलिशान सुविधा आहेत. याशिवाय राजवाड्यात एक मोठे थिएटर हॉल, प्रत्येकी 15 लाख रुपये किमतीचे 200 झुंबर आणि लाखो रुपयांचे स्पा सेंटर आणि मसाज टेबल्स आहेत. या राजवाड्याच्या आतील भागावर 33 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या शाही हवेलीच्या निर्मितीसाठी डोंगरही कापण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर येथे 100 किलो व्होल्टचे इलेक्ट्रिक सबस्टेशन, पक्के रस्ते, सांडपाणी व्यवस्था आणि स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात आली आहे.
अंदाजे 500 कोटींचा खर्च
जगनमोहन रेड्डी यांनी बांधलेला बंगला विशाखापट्टणममधील ऋषिकाँडा टेकडी परिसरात आहे. डोंगर कापून बांधलेल्या या बंगल्यासमोर एक विशाल समुद्र आहे. ह्या बंगल्याचा परिसर मनमोहक आहे. तसेच बंगल्याच्या आतील आणि बाहेरील सौंदर्यही अप्रतिम आहे. या बंगल्याचे बांधकाम करण्यासाठी अंदाजे 500 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. बंगल्याची रचना सोन्याच्या सजावटीसह इटालियन संगमरवरी फरशी आणि आलिशान फर्निचरसह अनेक भव्य वस्तुंनी करण्यात आली आहे. तसेच हवेलीत बसवलेल्या बाथटबची किंमत प्रत्येकी 40 लाख रुपये तर कमोडची किंमत प्रत्येकी 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
430 चौरस फूट जागेत बाथरुम
बंगल्यात लक्झरी वॉशरुम आहे. प्रत्येक बाथरुम 430 चौरस फूट जागेत बांधण्यात आला आहे. यातील बाथटबचा खर्च सर्वात जास्त आहे. फक्त बाथटबची किंमत 40 लाख रुपये आहे. या इमारतीच्या अंतर्गत सजावटीसाठी वस्तू आणि फर्निचरवर सुमारे 33 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावाही केला जात आहे.
रस्ते, उद्यानांनी खुलवले सौंदर्य
बंगल्यासोबतच परिसरातील रस्ते, कालवे आणि उद्यानांच्या विकासासाठी 50 कोटी रुपये स्वतंत्रपणे खर्च करण्यात आले. इमारतीबाहेरही उत्कृष्ट लँडस्केपिंग करण्यात आले आहे. उद्यानात 2 ते 3 प्रकारचे पदपथ बनवण्यात आलेले दिसतात. टेकडी परिसरातील डोंगरमाथ्यावर हिरवीगार वृक्षसंपदा असल्याने दूरवरून त्याचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसते.
आलिशान बंगला टीडीपीच्या ‘टार्गेट’वर
जगनमोहन मुख्यमंत्री असताना या बंगल्याचे काम सुरू झाले. आता ते सत्तेत नाहीत. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाने जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाचा पराभव केला होता. निवडणुकीदरम्यान टीडीपीनेही या बंगल्याला मुद्दा बनवला होता. या बंगल्यात सरकारी पैसे गुंतवण्यात आल्याचा आरोप टीडीपीने केला आहे. हा बंगला बांधताना कोस्टल रेग्युलेशन झोनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आता नायडू सरकार या बंगल्यावर पुढे काय कारवाई करते, हे पाहावे लागेल.
वादांच्या भोवऱ्यात अडकलेली हवेली
जगममोहन रे•ाr यांचा हा आलिशान बंगला वादांनी वेढलेला आहे. हवेलीत बसविलेल्या बाथटबची किंमत 40 लाख रुपये आणि प्रत्येक कमोडची किंमत 10-12 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचा आरोप सत्ताधारी टीडीपीने केला आहे. यासोबतच या हवेलीने कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) नियमांचे घोर उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मागील वायएसआर काँग्रेसच्या सरकारने कायदेशीर मार्गदर्शक तत्वांचे दुर्लक्ष केल्याच्या आरोपांनीही या बंगल्याला घेरलेले दिसते. तसेच विद्यमान मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी जगममोहन रे•ाr यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा ठपकाही ठेवला आहे. तथापि हा राजवाडा केवळ माजी मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही, तर तो जनतेच्या हितासाठी बांधण्यात आल्याचा दावा वायएसआर पक्षाकडून केला जात आहे.
मे 2021 मध्ये ‘सीआरझेड’ अंतर्गत मान्यता
जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना हा राजवाडा बांधला गेला होता. त्यावेळी जगनमोहन यांचा पक्ष वायएसआरसीपी भाजपसोबत अधिकृतपणे युतीत नव्हता. परंतु महत्वाच्या प्रसंगी सरकारला पाठिंबा देत असे. पण ते दिवस आता गेले आहेत. आता भाजप वायएसआरसीपीच्या कट्टर विरोधातील टीडीपीसोबत आहे. हा राजवाडा बांधण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मे 2021 मध्ये या भागात पर्यटन विकासाला मान्यता दिली होती. परंतु जगनमोहन रेड्डी यांनी मंजुरीचा गैरवापर करून खासगी बंगला बांधला. या प्रकल्पाला उच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीलाच या प्रकल्पात अनेक उल्लंघने आढळून आली. तथापि, त्यानंतर बांधकाम थांबले नाही.
जगनमोहन रेड्डीची धडधड वाढली...
आता आंध्रप्रदेशात एनडीएचा घटक पक्ष तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सरकार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्त्वातील सरकार या राजवाड्याबद्दल सतत प्रश्न उपस्थित करत आहे. सरकारी निधीच्या गैरवापराचा ठपका ठेवत मुख्यमंत्र्यांनी ‘जगन पॅलेस’ची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांची धडधड वाढली आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानीही असाच वाद निर्माण झाला होता. त्यांच्या सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या बंगल्याची दुरुस्ती आणि सजावट करण्यासाठी त्यांच्या सरकारने 45 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप होता. भाजपने ‘शीशमहाल’ असे म्हणत त्याची खिल्ली उडवली होती. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केजरीवालांवर निशाणा साधला होता. आता आंध्रप्रदेशमधील या वादग्रस्त आलिशान बंगला प्रकरणाशी जगनमोहन रेड्डी कशा पद्धतीने सामोरे जातात, हे पाहावे लागेल.
आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यांचा बंगला सध्या चर्चेत
आलिशान राजवाडा पाहून कोणीही होईल थक्क
दहा एकर क्षेत्रात निर्मिती, 500 कोटी रुपये खर्च
दहा लाखांचा कमोड अन् 40 लाखांचा बाथटब
-संकलन : जयनारायण गवस