For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या युगाची नांदी

06:22 AM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
नव्या युगाची नांदी
Advertisement

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिलांच्या गटात पोलंडच्या इगा स्वायटेक व पुऊष गटात इटलीच्या यानिक सिनेरने पटकावलेले विजेतेपद ही नव्या युगाची नांदीच म्हटली पाहिजे. ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, अमेरिकन आणि अमेरिकन या टेनिस जगतातील चार मानाच्या स्पर्धा. यामध्ये हिरवळीवरील विम्बल्डनचे महत्त्व अनन्यसाधारण होय. स्वाभाविकच या स्पर्धेत अवघ्या 57 मिनिटांत 6-0, 6-0 असे निर्भेळ यश संपादन करणाऱ्या इगाचे कौतुक होणे क्रमप्राप्त ठरते. 1988 मध्ये जर्मनीच्या स्टेफी ग्राफने फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात असाच एकतर्फी विजय मिळविला होता. त्यानंतर इगाने या विक्रमाशी बरोबरी करणे, यातूनच तिचा झपाटा अधोरेखित होतो. टेनिस कोर्ट आजवर अनेक महिला खेळाडूंनी दणाणून सोडल्याचा इतिहास आहे. मार्गारेट कोर्ट, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, मोनिका सेलेस, अरांत्झा सांचेझ, मार्टिना हिंगीस, विलियम्स भगिनी अशा अनेक टेनिस सम्राज्ञींचा त्यात समावेश होतो. इगाने सहावे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवून या पंक्तीत स्थान मिळविले आहे. मुख्य म्हणजे हार्ड, क्ले आणि ग्रास अशा तीन कोर्टवर अजिंक्यपद पटकावण्याची कामगिरी तिने केली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेत चार वेळा, तर अमेरिकन ओपनमध्ये एकदा तिने बाजी मारली आहे. विम्बल्डनच्या विजयापासून केवळ ती दूर होती. ही उणीवही तिने दूर केल्याचे दिसते. वास्तविक विम्बल्डनमध्ये तिचा खेळ म्हणावा तसा उंचावत नव्हता. परंतु, या स्पर्धेत तिने दाखवलेला आत्मविश्वास काही औरच होता. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या अरिना सबालेन्काचा पराभव करून तिने अंतिम फेरीत प्रवेश केला, यातच सर्व आले. अंतिम सामन्यात क्रॉस कोर्टवरचे खोलवर फटके आणि दमदार परतीचे शॉट्स असा मिलाफ तिच्या खेळामध्ये दिसून आला. त्यामुळे तिच्या या खेळाला जेतेपदाचे श्रेय द्यावे लागेल. खरे तर मागच्या काही वर्षांत विम्बल्डनमध्ये कोणत्याही महिला टेनिसपटूला सातत्य दाखवता आलेले नाही. इगा ही सलग आठवी नवी विजेती आहे. हे पाहता या विजयाने तिची जबाबदारी वाढली आहे. आता सातत्य टिकविण्याचे तिच्यापुढे आव्हान असेल. गेल्या काही वर्षांपासून महिला व पुऊष विजेत्यांना समसमान पारितोषिकाची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या नव्या राणीला 40 लाख डॉलर म्हणजे 34 कोटी ऊपये इतक्या घसघशीत रकमेचे पारितोषिक मिळाले आहे. तथापि, येथवर न थांबता ही गुणी टेनिसपटू नवा इतिहास रचण्यासाठी एकेक पाऊल पुढे टाकतच राहील, असा विश्वास वाटतो. विम्बल्डनमधील पुऊष एकेरीतील अंतिम सामना अविस्मरणीयच म्हणावा लागेल. गतविजेत्या कार्लोस अल्कारेझसारख्या तगड्या टेनिसपटूवर यानिक सिनेर याने मिळवलेला संघर्षपूर्ण विजय अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. प्रेंच ओपनच्या सामन्यात अल्कारेझनेच दोन सेटची पिछाडी भरून काढून सिनेरने अफलातून विजय मिळविला होता. या स्पर्धेतही सिनेर आघाडीवर होता. पण, अल्कारेझचा खेळ बघता तो कोणत्याही क्षणी पुनरागमन करेल, असाच रागरंग होता. परंतु, या वेळेला सिनेर याने संधी गमावली नाही व विम्बल्डन जेतेपदावर आपले नाव कोरले. मागच्या काही वर्षांत टेनिसवर प्रामुख्याने रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांचे राज्य राहिले आहे. फेडरर आणि नदालनंतर आता जोकोविचही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. मागच्या काही स्पर्धांचा अनुभव घेतला, तर आता अल्कारेझ व सिनेर युगाला सुऊवात झाल्याचेच प्रतीत होते. आत्तापर्यंत हे दोघे दहा वेळा समोरासमोर आले. त्यामध्ये अल्कारेझने सहा वेळा, तर सिनेरची चार वेळा सरशी झाल्याचे दिसून येते. फ्रेंच, विम्बल्डनसह अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्यात रोमांचकारी सामने झाले आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्यातील लढतीही बव्हंशी पाच सेटपर्यंत चालल्या आहेत. त्यातून त्यांच्यातील तोडीस तोड खेळाचेच दर्शन घडते. सिनेरने आत्तापर्यंत चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तर अल्कारेझच्या नावावर पाच ग्रँड स्लॅम पदके आहेत. त्यामुळे भविष्यात हे दोघे एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असू शकतात. सिनेरचा फोरहँड आणि बॅकहँड ताकदवान आहे. जलद आणि स्थिर सर्व्हिस, रॅलीजवर नियंत्रण, उत्तम तंदुऊस्ती हीदेखील त्याच्या खेळाची वैशिष्ट्यो आहेत. एकाग्रता व शांतपणाचा विचार केला, तर त्यापातळीवरही सिनेर सरसच म्हटला पाहिजे. त्यामुळे भविष्यातही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. या सामन्यात अल्कारेझला अपयश आले असले, तरी  मागच्या तीन ते चार वर्षांत त्याने दाखवलेले सातत्य लक्षवेधक ठरते. मागच्या दोन्ही विम्बल्डन स्पर्धांमध्ये जोकोविचसारख्या खेळाडूला पराभूत करून त्याने बाजी मारली, हे विसरता येत नाही. या वर्षी लाल मातीच्या कोर्टवरील त्याची कामगिरीही जबरदस्त म्हणायला हवी. त्याच्या शक्तिशाली फोरहँडमध्ये फ्लॅट आणि टॉपस्पीन दोहोंचा समावेश असल्याने ते प्रभावी ठरतात. बॅकहँडवर नियंत्रणही तितकेच वेधक म्हणता येईल. नेटवर जाऊन योग्य क्षणी ड्रॉप शॉटचा वापर करण्याची शैली केवळ ऐतिहासिक ठरावी. मुळात त्याचा खेळ अतिशय क्रिएटिव्ह आणि लवचिक आहे. त्याच्या शैलीत एकप्रकारचे सौंदर्य आहे. पदलालित्य किंवा एकूणच नजाकतीचा विचार केला, तर तो फेडररचा वारसदार शोभतो. टेनिससारख्या खेळात वेगाला महत्त्व आहेच. किंबहुना, त्याला शैलीची जोड मिळाली, तर या खेळाची अनुभूती अवर्णनीयच असते. अल्कारेझचा खेळ या जातकुळीतला आहे. टेनिस महिलांचे असो वा पुऊषांचे. या खेळाला अतिशय समृद्ध असा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे नेण्याची क्षमता नव्या पिढीमध्ये आहे, हे त्यांनी सिद्ध केले आहे. इगा, अरिना, कोको गॉफ किंवा अन्य महिला टेनिसपटू असतील किंवा पुऊषांमधील या टॉप जोडगोळीबरोबरच डॅनिल मेदवेदेव किंवा इतर खेळाडू असतील. या सर्व टेनिसताऱ्यांनी टेनिसचे नभांगण चमकत ठेवले आहे. त्या अर्थी नव्या युगाच्या दिशेने टेनिसची वाटचाल सुरू आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.