सुंदर सरोवराचे धोकादायक सत्य
जिवंत वाचणे देखील अवघड
सोशल मीडियावर रशियन शहर नोवोसिबिर्स्कच्या एका सरोवराची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. काही छायाचित्रांमध्ये महिला पाण्यात पोझ देताना दिसून येत आहेत. तर काही छायाचित्रांमध्ये कुणी बोटिंग करताना दिसून येते. परंतु प्रत्यक्षात हा केवळ देखावा आहे. कित्येक वर्षांपूर्वी या सरोवराची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. तेव्हा वैज्ञानिकांनी यावरून इशारा जारी केला होता आणि सरोवराच्या धोकादायक सत्याविषयी कल्पना दिली होती. पर्यटकांनी याच्या आकर्षक स्वरुपाला भुलू नये. कारण हे सरोवर प्रत्यक्षात एक विषारी जलाशय आहे. यात नजीकच्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून रासायनिक अवशेष सोडण्यात येतात असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
येथील जलाशय सुंदर असले तरीही या पाण्यात मिसळलेले कॅल्शियम आणि धातू ऑक्साइडदरम्यान रासायनिक प्रक्रियेमुळे याला हा रंग मिळाला आहे. अशा स्थितीत जर कुणी या पाण्यात गेला तर तो जिवंत वाचणे अवघड आहे. रशियातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या नोवोसिबिर्स्कच्या लोकांनी या सरोवराला ‘सायबेरियन मालदीव’ म्हणण्यास सुरुवात केली होती. अशा स्थितीत लोक येथे सेल्फी घेण्यास येऊ लागले, अनेक जण फॅशन आणि विवाहाच्या छायाचित्रणासाठी दाखल झाले. काहींनी तर सरोवराची सैर करण्याची योजनाही आखली. परंतु तेव्हा प्रकल्पाशी निगडित कंपनीने जलाशय विषारी नसल्याचा दावा केला होता.
पाणी अत्याधिक क्षारयुक्त आहे. अशा स्थितीत या पाण्याला कुणी स्पर्श केला तर त्याच्या त्वचेत जळजळ होऊ शकते असे कंपनीचे सांगणे आहे. सेल्फीच्या नादात राखेच्या ढिगात बदलू नका असे म्हणत कंपनीने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सरोवर केवळ 3-6 फूट खोल असून तळाला मोठा गाळ आहे. अशा स्थितीत त्यात कुणी कोसळला तर कुठल्याही मदतीशिवाय त्याला बाहेर काढणे शक्य नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
वैज्ञानिकांच्या इशाऱ्यानंतरही पर्यटक या सरोवराच्या ठिकाणी पोहोचत आहेत. काही जण तर पाण्यात उतरत आहेत. पयंतु पाण्यात उतरणाऱ्यांना याचा फटका बसतोय. कुणाच्या चेहऱ्याला अॅलर्जी होतेय तर काही जणांना ताप येत आहे. येथील पाण्याला डिटर्जंटचा वास येत असल्याचे अनेकांचे सांगणे आहे. हे सरोवर नैसर्गिक नाही, नोवोसिबिर्स्क शहराला ऊर्जापुरवठा करणाऱ्या औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळसा जाळल्यावर निघणाऱ्या रासायनिक कचऱ्याला विल्हेवाट लावण्यासाठी येथे खोदकाम करण्यात आले होते. 1970 च्या दशकात निर्मित हा औष्णिक ऊर्जा प्रकल्प सायबेरियातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.