कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘दामिनी अ‍ॅप’ सांगणार, वीज कोठे कडाडणार !

03:33 PM Jun 30, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / अवधुत शिंदे :

Advertisement

पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होते. विशेषत ग्रामीण भागात आणि शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. विजेचा फटका अचानक बसत असल्यामुळे त्याचा अंदाज लावता येत नाही आणि त्यामुळे शेतकरी अनेकदा धोक्याच्या सावटाखाली असतो. हीच बाब लक्षात घेऊन पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ‘दामिनी अ‍ॅप‘ (दामिनी लाइटनिंग अलर्ट अ‍ॅप) विकसित केले आहे. हे अ‍ॅप विजेच्या सिग्नल्सचा मागोवा घेत दर सात मिनिटांनी अपडेट देत विजेच्या संभाव्य ठिकाणांची माहिती पुरवते.

Advertisement

दामिनी अ‍ॅपचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वीज पडण्यापूर्वी अचूक पूर्वसूचना देणे जेणेकरून नागरिक, विशेषत शेतकरी, सुरक्षित ठिकाणी जाऊन आपले प्राण वाचवू शकतील. वीज कोठे आणि केव्हा पडू शकते, याची माहिती दिल्यामुळे नागरिक योग्य ती खबरदारी घेऊ शकतात.

1. दर सात मिनिटांनी अपडेट : दामिनी अ‍ॅप दर सात मिनिटांनी विजेच्या हालचालींचे अपडेट देते, ज्यामुळे नागरिकांना वेळेवर माहिती मिळते.

2. 10 किलोमीटरपर्यंत अचूकता : हे अ‍ॅप आपल्या स्थानापासून 10 किलोमीटरच्या परिसरात वीज पडण्याची शक्यता दर्शवते.

3. स्थानिक भाषांमध्ये अलर्ट : हे अ‍ॅप मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये माहिती पुरवते.

4. जीपीएस आधारित अलर्ट : वापरकर्त्याच्या स्थानानुसारच अलर्ट दिला जातो, त्यामुळे तो अचूक असतो.

5. शेतीसाठी उपयुक्त : शेतकऱ्यांना आंबा, भात, ऊस यांसारख्या पिकांवर वीज पडण्याच्या धोका टाळता येतो.

आजच्या हवामान बदलाच्या काळात अतिवृष्टी, वीज, गारपीट अशा आपत्ती अगदी अचानक घडतात. अशा वेळी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित माहिती मिळाली पाहिजे. दामिनी अ‍ॅप शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत शेतामधून सुरक्षितपणे बाहेर पडण्याची संधी देते.

उदाहरणार्थ, जर दामिनी अ‍ॅपवर अलर्ट आला की 10 किलोमीटर परिसरात वीज पडण्याची शक्यता आहे, तर शेतकरी लगेच सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो, आपल्या जनावरांना छपराखाली नेऊ शकतो आणि महत्त्वाचे उपकरणे वाचवू शकतो.

1. गुगल प्ले स्टोअरवर जा.

2. ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट अ‍ॅप असे सर्च करा.

3. अधिकृत अ‍ॅप डाउनलोड करून इंस्टॉल करा.

4. जीपीएस लोकेशन ऑन करा.

5. भाषा मराठी निवडा.

6. अलर्ट आणि सूचना मिळण्यासाठी नोटिफिकेशन सुरू ठेवा.

शेतात जाण्यापूर्वी अ‍ॅप तपासा.

विजेचा अलर्ट असल्यास शेतात जाणे टाळा.

शेतात असताना अचानक अलर्ट आला तर त्वरित उघड्या जागेपासून दूर जा.

लाकडी किंवा लोखंडी वस्तूंना हात लावू नका, उंच झाडाखाली थांबू नका.

सुरक्षित छपराच्या आश्रयाला जावे.

सरकारने हे अ‍ॅप विकसित करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, पण त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. कृषी विभाग, ग्रामपंचायत, कृषी अधिकारी यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना दामिनी अ‍ॅपची माहिती द्यावी, प्रत्यक्ष त्यांच्या मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करून द्यावे आणि त्याचा वापर कसा करायचा हे शिकवावे.

दामिनी अ‍ॅप हे शेतकऱ्यांचे जीवन वाचवणारे तंत्रज्ञान आहे. हवामान बदलाच्या या युगात अशा अ‍ॅप्सचा वापर केल्यास आपत्तीपूर्व सावधगिरीने मोठे नुकसान टाळता येते. शेतकऱ्यांनी अधिक सुरक्षित आणि माहितीपूर्ण शेतीसाठी दामिनी अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये जरूर ठेवावे आणि इतर शेतकऱ्यांनाही याचा उपयोग करून देण्यासाठी प्रोत्साहित करावे. विज्ञानाच्या मदतीने आपण निसर्ग आपत्तीशी मुकाबला करू शकतो, हे दामिनी अ‍ॅप सिद्ध करत आहे.

                                                                  -डॉ. मयुर सुतार, तांत्रिक अधिकारी , ग्रामीण कृषी हवामानशास्त्र प्रकल्प 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article