Kolhapur News : पाचगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
पाचगावात भटक्या कुत्र्यांचा त्रास शिगेला
कोल्हापूर : पाचगाव ग्रामपंचायत हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थ, विशेषतः लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध वसाहतींमध्ये कुत्र्यांचे मोठे कळप मुक्तपणे फिरत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
निगडे पार्क, साई समर्थ कॉलनी, ब्रह्मांडनायक कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, लक्ष्मी नंदा पार्क या भागांत कुत्र्यांचे कळप सकाळ-संध्याकाळ रस्त्यांवर फिरताना दिसतात. हे कुत्रे काहीवेळा लोकांच्या मागे लागतात, भुंकतात तसेच मुलांच्या खेळाच्या ठिकाणीही फिरत जातात. अलिकडे काही लोकांना कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या परिसरात दररोज कुत्र्यांचा कळप फिरतो. मुलांना बाहेर सोडणे धोक्याचे झाले आहे. अनेकांना कुत्रे चाबू लागल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई करावी. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पाचगाव ग्रामपंचायतीकडे त्वरित भटक्या कुत्र्यांविरोधात नियंत्रण मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.