For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानसभा निवडणुकीनंतरच गाळप हंगामास येणार वेग

11:25 AM Nov 19, 2024 IST | Radhika Patil
विधानसभा निवडणुकीनंतरच गाळप हंगामास येणार वेग
The crushing season will gain momentum only after the assembly elections.
Advertisement

कोल्हापूर / कृष्णात चौगले :

Advertisement

जिह्यातील 23 साखर कारखान्यांचे गाळप परवाने मंजूर झाले असले तरी केवळ दहा कारखान्यांचा हंगाम सुरु झाला आहे. पंचगंगा, डी. वाय. पाटील, दालमियासह एकूण दहा साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून उर्वरित 13 कारखान्यांच्या गाळप हंगामास विधानसभा निवडणुकीनंतरच वेग येणार आहे. निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या निकालानंतरच कारखान्यांचा गाळप हंगाम गतीमान होणार आहे.

जिह्यातील 10 साखर कारखानदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतरच आपले साखर कारखाने सुरु करण्याकडे त्यांचा कल आहे. शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजीत घाटगे (कागल मतदारसंघ), बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील (राधानगरी मतदारसंघ), सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे हसन मुश्रीफ (कागल), ‘कुंभी-कासारी‘चे चंद्रदीप नरके (करवीर), भोगावतीचे माजी चेअरमन दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील (करवीर) ‘दत्त शिरोळ‘चे गणपतराव पाटील (शिरोळ), शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर (शिरोळ), जवाहर कारखान्याचे चेअरमन राहूल पाटील (इचलकरंजी), वारणाचे चेअरमन विनय कोरे, राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण) विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

Advertisement

सोमवारी जाहीर प्रचाराची सांगता झाली असून पुढील दोन दिवस छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकालानंतरच या कारखान्यांचा हंगाम सुरु होणार आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय असले तरी त्यांनी डी.वाय.पाटील कारखाना आठ दिवसांपूर्वीच सुरु केला आहे.

अनेक कारखाना कार्यस्थळावर परजिह्यातील ऊस तोड मजूर दाखल
जिह्यातील अनेक कारखाना कार्यस्थळावर बीड, उस्मानाबाद आदी परजिह्यांतून ऊस तोडणी मजूर दाखल झाले आहेत. तर 23 पैकी सुमारे 7 ते 8 कारखान्यांना तोडणीसाठी स्थानिक मजूर उपलब्ध होतात. जे मजूर परजिह्यातून सध्या कोल्हापूरात आले आहेत, ते पुन्हा मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी आपल्या गावी जाणार आहेत. त्यामुळे संबंधित कारखानदारांनी कारखाने सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.

पूरबाधित शेतकऱ्यांचे डोळे गाळप हंगामाकडे
जुलै महिनाअखेरीस आलेल्या महापूरामुळे जिह्यात ऊस पिकाचे सुमारे 10 ते 15 टक्के नुकसान झाले आहे. त्यानंतर ऑक्टोबरअखेरपर्यंत झालेल्या परतीच्या पावसामुळे देखील उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. महापूर क्षेत्रातील ऊसाचे शेंडे कुजले असून केवळ बुडके शिल्लक आहेत. त्यामुळे कारखाने सुरु झाल्यानंतर तत्काळ हा ऊस कारखान्याकडे पाठवण्यासाठी शेतक्रयांचे डोळे गाळप हंगामाकडे लागले आहेत. तसेच शासनाकडून पूरबाधित ऊस पिकांचे पंचनामे झाले असले तरी शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही.

दहा कारखाने सुरू, पण ऊस तोड संथ गतीने
जिह्यात दहा कारखाने सुरू झाले असले तरी पुरेशा ऊस तोड मजूरांअभावी ऊस तोडीसह गाळप हंगाम संथ गतीने सुरू आहे. यामध्ये दालमियासह डी.वाय. पाटील कारखान्यांकडे मात्र ऊस तोडीसाठी पुरेशी स्थानिक यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

Advertisement
Tags :

.