युएईचे युवराज येणार भारत दौऱ्यावर
मुंबईतील बिझनेस फोरममध्ये होणार सामील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरातचे (युएई) युवराज शेख खालिद बिन जायद अल नाहयान लवकरच दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावर त्यांचा हा अधिकृत दौरा 9-10 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. युवराज म्हणून अल नाहयान यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.
या दौऱ्यादरम्यान अल नाहयान यांच्यासोबत युएई सरकारचे अनेक मंत्री आणि एक शिष्टमंडळ असणार आहे. युवराज अल नाहयान हे 9 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर चर्चा करतील. याचबरोबर अल नाहयान हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटतील आणि राजघाट येथे जात महात्मा गांधी यांना श्रद्धांलजी वाहणार आहेत.
10 सप्टेंबर रोजी अल नाहयान हे मुंबईचा दौरा करणार असून एका बिझनेस फोरममध्ये सामील होणार आहेत. यात दोन्ही देशांचे उद्योजक भाग घेणार ाहेत. भारत आणि युएईदरम्यान ऐतिहासिक स्वरुपात जवळचे आणि मैत्रिपूर्ण संबंध राहिले आहेत. अलिकडच्या वर्षांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांदरम्यान व्यापक रणनीतिक भागीदारी दृढ झाली आहे. यात व्यापार, गुंतवणूक, राजनयिक, संपर्क, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संस्कृती सामील असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
युवराजांचा दौरा भारत-युएई द्विपक्षीय संबंधांना अधिक मजबूत करणार तसेच नव्या आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये भागीदारीच्या संधी खुल्या करणार असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेब्रुवारीमध्ये युएईचा दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली होती. तसेच त्यावेळी 8 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. यादरम्यान भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरसाठी एक आंतर-शासकीय आराखडा तयार करण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली होती. युएईच्या दौऱ्यादरम्यान मोदींनी अबू धाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले होते. तसेच अहलान मोदी कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित केले होते.