संकट ‘पाणी-बाणी’चे
देशाच्या बहुतांश भागात तीव्र पाणीटंचाईची भीती, यंदाचा उन्हाळा तापदायक ठरण्याचे भाकीत व्यक्त
देशासह संपूर्ण जगाच्या वातावरणावर परिणाम करणाऱ्या एल निनोचा प्रभाव हळूहळू कमी होत असला, तरी पुढच्या टप्प्यातही सजीवसृष्टीकरिता त्याचे अस्तित्व तापदायकच ठरणार आहे. मार्च ते मेदरम्यान भूभागावरचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार असल्याचे भाकीत जागतिक हवामान संस्थेकडून वर्तविण्यात आले आहे. त्याच्या झळा आत्तापासूनच जाणवू लागल्या असून, आगामी अडीच महिन्यांत त्या अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आजमितीला देशातील निम्म्या जलाशयांमध्ये जेमतेम 40 टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसत आहे. उन्हाचा तडाखा, आटलेले जलायश, कोरड्या पडलेल्या कूपनलिका पाहता भारताच्या विविध भागांत दुष्काळाचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीपासून जागतिक स्तरावर तसेच देशात एल निनोचा प्रभाव वाढला आहे. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या गरम पाण्याच्या प्रवाहांना ‘एल निनो’ असे म्हणतात. हे गरम पाण्याचे प्रवाह जगभरातील वातावरणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतात. याने समुद्राचे तापमान तर वाढतेच, पण मान्सून तसेच इतर देशातील हवामान यावरही विपरित परिणाम होतो. मागील आकडेवारी पाहता, जेव्हा केव्हा एल निनो उद्भवला, तेव्हा बहुतांश वेळा देशात कमी पाऊस नोंदविला गेला असून, दुष्काळाला सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. सर्वसाधारणपणे दोन ते सात वर्षांच्या कालावधीत एल निनो निर्माण होत असतो आणि त्याचा प्रभाव 9 ते 12 महिने जाणवत राहतो. मागच्या वर्षी एल निनोचा प्रभाव वाढीस लागला. जून 2023 पासूनच तापमानवाढ नवीन उच्चांक नोंदवित आहे. त्यामुळे 2023 हे वर्षं आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदविण्यात आले. याला एल निनोबरोबरच ‘हरितवायूंचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन’ हा प्रमुख घटक कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. याशिवाय यंदाचा जानेवारी महिना आतापर्यंतचा सर्वाधिक उष्णतेचा महिना ठरला, तर फेब्रुवारी महिन्यातही तापमानवाढीचा सिलसिला कायम राहिला. मार्चचे मागचे पंधरा दिवसही अतिशय कडक उन्हाळ्याचे ठरले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून जाणवणारा उन्हाचा तडाखा, भर दुपारच्या प्रचंड झळा आणि अगदी सायंकाळी व रात्रीपर्यंतची उष्णतेची काहिली असेच वातावरण जवळपास बहुतांश शहरांमध्ये अनुभवायला मिळत आहे. आगामी काही दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा निर्माण होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हे पाहता या वर्षीचा उन्हाळा अनेकार्थांनी कसोटीचा असेल.
उन्हाचा तडाखा जितका तीव्र असतो, तितके पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यात यंदा एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात पावसाने ताण दिला. अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. 60 टक्के भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. तसेच मान्सूनोत्तर काळात म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातही देशात सरासरीपेक्षा 50 टक्के कमी पाऊस झाला. त्यात या वर्षी जानेवारीपासूनच उन्हाळा जाणवण्यास सुऊवात झाल्याचे पहायला मिळते. अत्यल्प पाऊस आणि उन्हाच्या तडाखा यामुळे नद्या, तलाव, धरणे, विहिरी, कूपनलिका असे पाण्याची विविध स्रोत आटू लागल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस धरणांतील पाणीसाठा कमी होत असून, पाण्याचे गंभीर संकट विविध भागांत ओढवण्याची चिन्हे आहेत.
देशात केवळ 40 टक्केच पाणीसाठा
देशातील महत्त्वाच्या जलशयांपैकी निम्म्या जलाशयांमध्ये 40 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याचे केंद्रीय जल आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. देशातल्या प्रमुख अशा 150 जलशयांपैकी तब्बल 75 जलाशयांमधील पाणीसाठा 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर 21 जलाशयांमधील पाणीपातळी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच 32 जलाशयांमधील पाणीसाठा हा 62 टक्क्यांहून अधिक घटला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चिंतेचे ढग
मागील हंगामाचा विचार केला, तर याच काळात या जलाशयांमधील पाणीसाठ्याचे प्रमाण हे 84 टक्के इतके होते. मागील दहा वर्षांच्या सरासरीचा विचार केला, तर पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 97 टक्के होता. परंतु, यंदा मार्च महिना संपण्याच्या आधीच हा साठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे दिसत आहे. पाणीसाठ्याची क्षमता 178 अब्ज घनमीटर इतकी असताना तो केवळ 70 अब्ज घनमीटर इतकाच सीमित असणे, यातूनच पाणीसंकट किती गहिरे आहे, यावर प्रकाश पडतो.
महाराष्ट्रातही जलसंकट
केंद्रीय जलआयोगाने महाराष्ट्रातील 32 जलाशयांच्या पाणीसाठ्याची माहिती दिली आहे. या जलाशयांमध्ये जिवंत पाणीसाठ्याच्या एकूण क्षमतेपैकी केवळ 44 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक असल्याचे म्हटले आहे. याच कालावधीत मागील हंगामात 61 टक्के इतका साठा होता. गेल्या दहा वर्षांची मार्चमधील सरासरी ही 49 टक्के इतकी राहिली आहे. त्या तुलनेत 44 टक्के साठा शिल्लक असणे, ही पाणीबाणीकडे वाटचाल असल्याचेच अधोरेखित होते. पुढच्या काही दिवसात उष्णता आणखी वाढणार, काही भागांत उष्णतेच्या लाटा उसळणार, हे पाहता पाणीसाठ्यात झपाट्याने घट अपेक्षित आहे. स्वाभाविकच इतका पाणीसाठा चांगला पाऊस होईपर्यंत पुरविणे, हे राज्यापुढील आव्हान असेल.
दक्षिण भारतात गंभीर स्थिती
दक्षिण भारतातील अनेक राज्ये आत्ताच अवर्षणाच्या चक्रात अडकली आहेत. कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळूर शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या राज्यातील पाणीपातळी सरासरीपेक्षा 26 टक्क्यांनी कमी असून, अनेक शहरांमधील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळित झाली आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाच्या 42 जलाशयांपैकी तब्बल 30 जलाशयांमध्ये 40 टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्याचे आकडेवारी सांगते.
आंध्रात पाणीबाणी
यातील आंध्र प्रदेश या राज्यात पाणीबाणीच निर्माण झाली आहे. तेथे सरासरीपेक्षा 68 टक्के पाणीसाठा कमी असल्याचे सांगण्यात येते. तामिळनाडूत 27 टक्के कमी साठा असून, केरळात सरासरीएवढाच पाणीसाठा असल्याची माहिती यासंदर्भातील अहवालात देण्यात आली आहे.
पाण्याचे नियोजन आवश्यक
उन्हाळा आणि पाणीटंचाई हे समीकरणच मानले जाते. या काळात दरवर्षीच अनेक शहरांमध्ये व गावांमध्ये अवर्षण जाणवते. त्यामुळे अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा उन्हाळा सुरू होण्याआधीच अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जवळपास सर्वत्रच धरणे, तलावांमधील पाणी आक्रसले आहे. हे पाहता पाणीबचतीचा मंत्र जपणे आवश्यक ठरते. प्रत्येकाने पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करण्यास प्राधान्य द्यायला हवे. वाहने धुणे, नळ सुरूच ठेवणे, अतिरिक्त पाणी वापर करणे, या गोष्टी टाळायला हव्यात. याशिवाय पाणीगळतीची ठिकाणे शोधून प्रशासनाने पाणी वाचविण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत.
पाणीकपातीचे संकट?
धरणसाठ्यातील लक्षणीय घट आणि पाणीकपात यांचा परस्परसंबंध सर्वांनाच ठाऊक आहे. जलाशयातील साठा कमी झाल्यानंतर बऱ्याचदा हा मार्ग अवलंबला जातो. उपलब्ध साठा पाहता पुढच्या टप्प्यात देशातील अनेक शहरांमध्ये पाणीकपात होऊ शकते. या सगळ्या संकटास सामोरे जाण्यासाठीही तयार रहावे लागेल.
आरोग्य जपा
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, हा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी दरवर्षी देत असतात. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांत आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. उलट्या, जुलाब, ताप, अशक्तपणा, कमी रक्तदाबाच्या समस्या वाढल्या आहेत. या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. पुरेसे पाणी पिणे, फलाहार, ताजे ताक, बर्फविरहित लिंबू सरबत, कोकम सरबत यातून शरीरातील पाणी कसे टिकवून ठेवता येईल, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शक्यतो सकाळच्या वेळेस घराबाहेर पडणे किंवा दुपारी बाहेर पडताना डोक्यावर ऊमाल, टोपी, स्कार्पचा वापर करणे, या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कॉटन, खादी वा तत्सम कपडे आणि गॉगल वापरण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
उमेदवारांचा कस
एकीकडे सूर्यदेव आग ओकत असताना दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकांचाही बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, देशात सात टप्प्यात निवडणुका होतील. पहिला टप्पा एप्रिलला, तर सातवा टप्पा 1 जूनला पार पडेल. हा संपूर्ण कालावधी हा कडक उन्हाळ्याचा असेल. त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांचा अक्षरश: कस लागणार आहे. त्या अर्थी यंदाची निवडणूक ही सर्वपक्षीय उमेदवारांसाठी ‘ताप’दायकच ठरण्याची चिन्हे आहेत.
मार्च ते मेदरम्यान एल निनो कायम राहणार
जागतिक हवामान विभागाच्या अंदानुसार, मार्च ते मेदरम्यान एल निनो कायम राहण्याची शक्यता 60 टक्के, तर एप्रिल ते जूनदरम्यान तो तटस्थ राहण्याची शक्यता 80 टक्के आहे. तर या वर्षाच्या अखेरीस ला निनोचे संकेतही देण्यात आले आहेत. स्वाभाविकच उन्हाळा कडकच राहणार आहे.
प्रशांत चव्हाण, पुणे