क्रीडा संकुलातील कोरोना गोदाम हटणार
मिरज :
गेल्या तीन वर्षांपासून कोरोना गोदाम म्हणून कुलपबंद असलेला जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. कोरोना साहित्यांच्या अडगळीत अडकलेल्या क्रीडा संकुलाच्या गैरसोयीबाबत 'तरुण भारत संवाद'ने वृत्त प्रसिध्द केले होते. हे वृत्त प्रसिध्द होताच जिल्हा क्रीडा विभागाला जाग आली आहे.
क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून शासकीय निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच क्रीडा संकुलात सर्वसुविधा उपलब्ध करण्यासह कोरोना गोदामही रिकामे करणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे क्रीडा प्रेमींकडून 'तरुण भारत'च्या वृत्ताचे कौतुक होत आहे.
कोरोना महामारीवेळी सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये कोरोना विलगीकरण कक्ष सुरू केले होते. कोरोना साथ संपुष्टात आल्यानंतर हा विभाग पूर्ववत सुरू करणे अपेक्षित होते.
मात्र, जिल्हा प्रशासनाकडून सर्व कोरोना साहित्यांची अडगळ या हॉलमध्ये ठेवण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी हा हॉल बंद असल्याने बॅडमिंटन खेळाडूंची गैरसोय निर्माण झाली होती. त्यामुळे क्रीडा प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात होती. 'तरुण भारत'ने वृत्त प्रकाशित करुन या समस्येवर आवाज उठविला होता.
या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सविस्तर निवेदन जाहीर केले आहे. क्रीडा संकुल लवकरच खेळाडूंच्या सेवेसाठी सज्ज होत असल्याचे सांगितले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाकडून निधी उपलब्धतेसाठी कार्यवाही सुरू आहे. लवकरच कोरोना गोदाम रिकामे करण्यासह खेळाडूंसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
बॅडमिंटन हॉल, सिंथेटिक धावण मार्ग, नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान आदी सुविधांवर भर देण्यात येत आहे, असे क्रीडा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये उभारलेले कोरोना सेंटर सध्या बंद अवस्थेत आहे. या सेंटरमधील फॅब्रिकेशन स्ट्रक्चर हटविणे. यासोबतच वुडन बॅडमिंटन कोर्ट नव्याने तयार करण्यासाठी प्रशासकीय मान्यता व निधी मागणीचा प्रस्ताव क्रीडा विभागास सादर करण्यात आला आहे.
त्यास प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही अंतिम टप्यात असल्याची माहिती देण्यात आली. प्रशासकीय मान्यता तसेच निधी प्राप्त होताच पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने (बी.डब्लूएफ) मान्यता दिलेल्या मेपल वूडमध्ये चार कोर्ट निर्माण केले जाणार आहेत. हे बॅडमिंटन कोर्ट निर्माण झाल्यास येथून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे.
चार वुडन कोर्ट सांगलीकरांना बॅडमिंटन खेळण्यास उपलब्ध करून दिल्याने बॅडमिंटन हॉलला पुन्हा गत वैभव प्राप्त होईल अशी आशा क्रीडा प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
- गवताच्या मैदानासाठी पाच कोटींची तरतूद
क्रीडा संकुलात सुसज्ज असा ८ लेनचा ४०० मीटर सिंथेटिक घावण मार्ग व धावण मार्गाच्या आतील बाजूस नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान बनविण्याचे प्रस्तावित आहे. सिंथेटिक धावण मार्गास प्रशासकीय मान्यतेबरोबरच ५ कोटी निधी प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यातील खेळाडू, युवक व नागरिकांना विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्याने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यास सहाय्य होणार आहे.