आरोग्य विभागाला न्यायालयाचा दणका! निवड रद्द केलेल्या ७ उमेदवारांच्या बाजूने निकाल
महाराष्ट्र अॅडमिनीस्ट्रेटीव्ह ट्रिब्युनाल, मुंबई यांचा निकाल
वाकरे प्रतिनिधी
आरोग्य विभागाची स्टाफ नर्स अर्जप्रकिया सदोष ठरवून निवड रद्द करण्यात आलेल्या ७ उमेदवारांना महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रीब्युनल, मुंबई या न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कीं सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांच्या ऑगस्ट २०२३ मधील जाहिरातीमध्ये दिलेल्या निर्देशांनुसार प्रीती चौहान (रा. कणेरीवाडी, कोल्हापूर), शुभदा कांबळे (रा. बालिंगा, कोल्हापूर), धनश्री पोवार (रा.सुभाषनगर, कोल्हापूर) , सायली मिसाळ (रा. वडणगे, कोल्हापूर), अरुणा दांडेगावकर (रा. नांदेड), कांचन खाडे (रा.ठाणे) , निशात अत्तार (रा.सांगली) यांनी स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज भरले होते. योग्य त्या छाननीनंतर सर्व उमेदवारांची सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर मंडळसाठी स्टाफ नर्स या पदासाठी निवड देखील करण्यात आली. तथापि दरम्यानच्या कालावधीत सार्वजनिक आरोग्य विभाग, यांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काही बदल केले आणि या बदलांनुसार अर्ज भरला गेला नाही या कारणास्तव सात ही उमदेवारांची निवड उपसंचालक सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर मंडळ यांनी एप्रिल २०२४ मध्ये रद्द केली.
या सर्व उमेदवारांनी अँड. योगेश जोशी (कुडीत्रेकर) यांचे मार्फत महाराष्ट्र अॅडमिनीस्ट्रेटीव्ह ट्रिब्युनाल, मुंबई यांचेकडे वरील निकालाविरुद्ध दाद मागितली होती.या ट्रिब्युनालने दि. १३ मे २०२४ रोजी आदेश पारित करून या प्रकरणी सर्वस्वी चूक सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांची आहे हा युक्तिवाद मान्य करून आरोग्य विभागाने दिलेला निवड रद्दचा आदेश चुकीचा
असल्याचा ठरवले यामुळे सर्व सात उमेदवारांना त्यांच्या स्टाफ नर्स या पदावर नेमणूक देण्यात येणार आहे, यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व उमेदवारांतर्फे अँड.योगेश जोशी (कुडीत्रेकर) यांनी काम पहिले.