आगीचा ‘वणवा’ होऊ नये यासाठी सरकार जागरूक
कोणीही असू द्या, चौकशी होणारच : प्रसंगी न्यायालयीन चौकशीही करू : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी : हडफडेतील क्लबमध्ये झालेल्या अग्नितांडवाची सध्या दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू असून पुढे गरज भासल्यास त्या घटनेची न्यायालयीन चौकशीसुद्धा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. बर्च नाईट क्लबमधील आगीच्या दुर्घटनेचा तपास व सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी नंतर पर्वरी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही परवान्यांविना चालत होते व्यवहार
पूर्णत: बेकायदेशीर असलेल्या या क्लबकडे बांधकाम, अग्निशामक, पर्यटन यापैकी कोणताही परवाना नव्हता. इतर सुरक्षा यंत्रणाही नव्हत्या. केवळ स्थानिक पंचायतीने दिलेला व्यापारी परवाना होता व त्याच्याच आधारे तेथील व्यवहार चालत होते. आता या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ऑडीट सुरक्षा समिती आणि कारवाईसाठी देखरेख समिती स्थापन करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोणीही असू द्या, चौकशी होणारच
या प्रकरणात आयपीएस, आयएएस, आरपीएस वा अन्य कोणताही अधिकारी गुंतलेला असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांची चौकशी होणार असून कुणाचीही गय करण्यात येणार नाही. दंडाधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर सर्व संबंधितांना नोटिसा पाठवून कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लुथरा बंधूंना लवकरच अटक
या प्रकरणात आतापर्यंत सरकारचे दोन वरिष्ठ अधिकारी तसेच एक तत्कालीन पंचायत सचिव यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याशिवाय आतापर्यंत या क्लबशी संबंधित 6 जणांना अटक करण्यात आली आहे. गौरव आणि सौरभ लुथरा हे विदेशात पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गोवा पोलीस, सीबीआय आणि अन्य संबंधित एजन्सींच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लवकरच त्या दोघांनाही अटक करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
क्लब असो वा कॅसिनो, सुरक्षेशी तडजोड नाहीच
या दरम्यान, बर्च क्लबमध्ये झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती मांडवीत तरंगणाऱ्या एखाद्या कॅसिनो जहाजावर घडल्यास काय होईल? असे विचारले असता, क्लब असो वा कॅसिनो, सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही. ती सर्वांसाठी समान असेल, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. अबकारी खात्याने अधिक कठोर व्हावे व एखादे बार त्याच्या निर्धारित वेळेनंतरही रात्री उशिरांपर्यंत चालत असल्याचे दिसून आल्यास कारवाई करावी, असे सांगितले. त्याही पुढे जाताना एखाद्या बार आस्थापनाने दोन वेळा नियम मोडल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांचा अबकारी परवाना निलंबित करण्यात यावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. याच धर्तीवर अग्निशामक यंत्रणेच्या बाबतीतही कठोरतेने पाहणी करावी तसेच ‘रेंट अ बाईक‘, ‘रेंट अ कार‘ यांच्यावर करडी नजर ठेवावी व त्यांनी नियम मोडल्यास कारवाई करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.