देशाच्या टेनिस क्षेत्रातील धडाकेबाज खेळाडू : संदेश कुरळे
शंभराहून अधिक राष्ट्रीय स्पर्धेत केले प्रतिनिधीत्व : पन्नासहून अधिक स्पर्धेत पटकावले अजिंक्यपद, आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेपर्यंत मारली मजल
कोल्हापुरातील टेनिसस्टार ऐश्वर्या जाधवबरोबरच आता गडहिंग्लजचा संदेश दत्तात्रय कुरळे हाही धडाकेबाज टेनिसस्टार म्हणून नावारूपाला आला आहे. वयाच्या तेराव्या वर्षी टेनिस मैदानात उतरलेल्या संदेशने गेल्या 12 वर्षात शंभरावर राष्ट्रीय टेनिस स्पर्धांमध्ये एकेरी व दुहेरी प्रकारातून सहभागी होऊन पन्नासहून अधिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन आयोजित विविध आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील एकेरी व दुहेरी प्रकारातून प्रतिनिधित्व करत संदेशने भारतातसह विविध देशांमधील ताकतीच्या खेळाडूंना संदेशने टक्कर दिली आहे. संदेश हा मुळचा चन्नेकोपी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या गावचा. त्याच्या घरातील कोणाचाच टेनिस संबंध नाही.
संदेशने लहानपणी धावपटू होण्याचे ठरवले होते. परंतु वडील दत्तात्रय यांनी पुढाकार घेऊन संदेशला टेनिसचे कोल्हापुरातील प्रशिक्षक उत्तम फराकटे यांच्याकडे सरावासाठी सोपवले. त्यानुसार प्रत्येक शनिवार-रविवारी फराकटे यांच्याकडे टेनिसच्या सरावाला त्याने सुरुवात केली. यावेळी संदेश लेट श्री. बी. आर. चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. सरावासाठी तो चक्क एसटी बसेसने चन्नकोपीहून कोल्हापुरात यायचा. सराव झाला की पुन्हा एसटीने गावी जायचा. एसटीने कोल्हापुरात येण्याचा, सराव करण्याचा आणि शालेय अभ्यासाचा मेळ घालणे तसेच कठीणच होते. परंतु प्रवास, अभ्यासाचा न ताण घेता फराकटे यांच्याकडून टेनिसचे बेसिक धडे घेतले. संदेश टेनिस चांगला खेळतो कळल्यानंतर वडीलांनी त्याच्या सरावाचा एक दिवस वाढवला.
वडीलांनी शेतात बनवला टेनिसकोर्ट
संदेशचा सराव आणखी चांगला व्हावा यासाठी वडिलांनी आपल्या शेतामध्येच टेनिस कोर्ट बनवला. शाळेला जाण्यापूर्वी आणि शाळेहून घरी आल्यानंतर संदेश याच टेनिस कोर्टवर सराव करू लागला. या सरावामुळे सर्व्हिस करण्याबरोबरच विऊद्ध खेळाडूच्या कोर्टात बॅकहॅण्ड आणि फोरहॅण्डने चेंडू मारण्याची त्याची चांगली तयारी झाली. पुढील एक वर्षानंतर तो मेरी वेदर ग्राउंडजवळील कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनमध्ये टेनिसचे आधुनिक प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. असोसिएशनचे प्रशिक्षक अरिफ सिद्धिकी यांच्याकडून मिळालेल्या टिप्सनुसार संदेश हा सफाईदारपणे टेनिस खेळू लागला. संदेशकडील टेनिसचे कौशल्य पाहून महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनने त्याला आधुनिक सरावासाठी थायलंडला पाठवले. यावेळी संदेश हा फक्त बारा वर्षाचा होता.
संदेशकडून आधुनिक सराव सुऊ...
दैनंजिन सरावाच्या जोरावर त्याने औरंगाबादेत झालेल्या राष्ट्रीय 14 वर्षाखालील मुलांच्या टेनिस स्पर्धेत प्रतिनिधित्व करून प्रतिस्पर्ध्यांना हरवत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे सचिव सुंदर अय्यर यांनी टेनिसमधील पुढील वाटचालीसाठी इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन सर्टिफाइड कोच अर्षद देसाई, मनाल देसाई यांच्याकडूनही सरावाच्या टिप्स घेण्याची संदेशला सूचना केली. कालांतराने देसाई बंधूंच्या मार्गदर्शनाखाली संदेशने महालक्ष्मी जिमखानातील टेनिस कोर्टवर सराव मोठ्या स्पर्धां खेळण्यासाठी फिट झाला.
संदेशने मिळवले राष्ट्रीय स्पर्धेत उत्तुंग यश
सराव चांगल्या पद्धतीने करता यासाठी संदेश व प्रशिक्षक देसाई बंधू हे तिघेही कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनकडे (केडीएलटीए) शिफ्ट झाले. असोसिएशनच्या टेनिस कॉम्प्लेक्समध्ये संदेशचा सराव सुऊ झाला. 2019-2020 साली शालेय 17 वर्षाखालील मुलांच्या टेनिस स्पर्धेअंतर्गत झालेल्या मनपास्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत वर्चस्व सिद्ध करत राष्ट्रीय स्पर्धेत धडक दिली. राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणाचा खेळाडू करण सिंग यांच्यासोबत संदेशचा अंतिम सामना झाला. करण सिंग हा संदेशपेक्षा तयारीचा खेळाडू होता. परंतु संदेशने त्याला कडवी झुंज दिली. या सामन्यात भलेही करण सिंग जिंकला असला तरी उपविजेता राहिलेल्या संदेशचा खेळ उठून दिसला. स्पर्धेत मिळालेल्या उपविजेतेपदामुळे संदेशला खेलो इंडियाअंतर्गत होणाऱ्या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. इंदोर येथे 2021 साली ऑल इंडिया लॉन टेनिस फेडरेशन आयोजित अखिल भारतीय 18 वर्षाखालील मुलांच्या टेनिस स्पर्धेत उतऊन संदेशने तुल्यबळ खेळाडूंना पराभूत करत अजिंक्यपद पटकावले. संदेशचे हे पहिले राष्ट्रीय अजिंक्यपद होते. अजिंक्यपदासाठी झालेल्या अंतिम सामन्यात सातारा येथील ताकतवर खेळाडू मानस धामणेला संदेशला हरवले होते. 2021 सालीच चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय 18 वर्षाखालील मुलांच्या टेनिस स्पर्धेतील दुहेरी प्रकारातही संदेशने चिराग धुहानच्या साथीने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत विजेतेपद प्राप्त केले. या विजेतेपदामुळे संदेशही ताकतवर खेळाडू म्हणून नावाऊपाला आला. आपण राष्ट्रीय खेळाडूलाही टक्कर देऊ शकतो याची जाणिवही त्याला झाली. त्यामुळे त्याने सरावाचे तास वाढवले.
सर्व्हिससह बॅकहॅण्ड आणि फोरहॅण्डमध्ये झाला माहिर...
रोज सहा तास सराव करताना त्याने वेगाने सर्व्हिस करण्याचा जोरदार सराव केला. चपळाईने बॅकहॅण्ड आणि फोरहॅण्डने विऊद्ध खेळाडूच्या कोर्टात चेंडूला मारण्यातही तो माहीर झाला. प्रशिक्षकांशी सल्लामसलत करत तो खुल्या गटातून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्वही करू लागला. गेल्या बारा वर्षात त्याने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, दिल्ली, गुजरात, चेन्नई, आसाम, भोपाळ, भुवनेश्वर, देहराडून, चंदिगड, गुरुग्राम व हरियाणा यासह ठिकठिकाणी झालेल्या शंभरहून अधिक राष्ट्रीय टेनिस स्पर्धांमधील एकेरी व दुहेरी प्रकारातून प्रतिनिधित्व पन्नासहून अधिक स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. बक्षीसऊपी मिळालेल्या चषकांनी तर संदेशचे घर भरून गेले.
शिवाजी विद्यापीठ संघातून खेळतानाही स्पर्धा गाजवल्या...
गडहिंग्लजमधील शिवराज महाविद्यालयातून शिक्षण घेत असताना संदेश हा शिवाजी विद्यापीठाच्या संघातून विविध टेनिस स्पर्धेतही नाव कमवत होता. 2022-23 साली मुंबई येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेनिस स्पर्धेत संदेश व सहकारी खेळाडूंनी प्रतिनिधीत्व करत कांस्यपदक जिंकले. या कामगिरीमुळे संदेश व सहकारी खेळाडूंना अखिल भारतीय आंतरविद्यापीठ व खेलो इंडियामधील टेनिस स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. 2023-24 साली ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेनिस स्पर्धेतील एकेरी व दुहेरी प्रकारातही हुकूमत गाजवत संदेश व सहकारी खेळाडूंनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. संदेशच्या कामगिरीमुळेच शिवाजी विद्यापीठाला टेनिसमध्ये पहिलेच सुवर्णपदक मिळाले. या सुवर्ण पदकामुळेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आणि खेलो इंडियाअंतर्गत टेनिस स्पर्धेतही संदेश व सहकारी खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली. खुल्या गटाअंतर्गतच भारत सरकारने अहमदाबादेत आयोजित केलेल्या प्रतिष्ठेच्या नॅशनल गेम्समधील टेनिस स्पर्धेतही संदेशने महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व करत चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. यानंतर देहराडूनमधील नॅशनल गेम्समधील टेनिस स्पर्धेतही संदेशने महाराष्ट्र संघातून उतऊन एकेरी व दुहेरी प्रकारात कांस्यपदक पटकावले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवला...
संदेशने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संदेशने ठसा उमटवला आहे. इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनकडून आयोजित एम 15 आणि 25 आयटीएफ टेनिस स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी असे प्रत्येक भारतीय टेनिसपटूला वाटत असते. संदेशने अथक परिश्रमाच्या जोरावर एम 15 आणि 25 आयटीएफ टेनिस स्पर्धेत अनेकदा प्रतिनिधित्व करून भारतासह विविध देशांमधील ताकतवर खेळाडूंना लढत दिली आहे. या कामगिरीमुळे संदेशला 2022 साली ऑल टाइम प्रोफेशनल्सच्या जागतिक क्रमवारीत स्थान मिळाले होते. गेल्या आठवड्यात भुवनेश्वरात झालेल्या एम 15 आयटीएफ टेनिस स्पर्धेती पात्रता फेरीमधील तीन सामने जिंकून त्याने मुख्य फेरीतही प्रवेश केला. तसेच फेरीतील पहिला सामना जिंकून महत्त्वपूर्ण असा एक गुण मिळवत जागतिक क्रमवारी दुसऱ्यांदा स्थान मिळवले.
चांगल्या प्रशिक्षकांमुळेच मी मोठी मजल मारू शकलो
ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळण्याची जिद्द मनात बाळगून मी गेल्या सहा महिन्यापासून गडहिंग्लजहून कोल्हापुरातच स्थायिक झालो आहे. शिवाजी विद्यापीठ आणि पोलीस परेड मैदानातील टेनिसच्या कोर्टवर सध्या सराव करत आहे. पुढील 2026 या सालामध्ये जागतिक क्रमवारीतील 1000 क्रमांकाच्या आतमध्ये स्थान मिळवण्याचे माझे लक्ष्य आहे. टेनिसमध्ये आजवर केलेल्या मोठ्या कामगिरीसाठी वडीलांसह प्रशिक्षक उत्तम फराकटे, अरिफ सिद्दिकी व देसाई बंधूंनी यांनी मला दिलेले प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले आहे.
-संदेश कुरळे (राष्ट्रीय टेनिसस्टार)
संग्राम काटकर