For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशातील सर्वात खडतर रेल्वेमार्ग पूर्णत्वाला

12:34 PM Sep 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
देशातील सर्वात खडतर रेल्वेमार्ग पूर्णत्वाला
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन : 8071 कोटी रुपये खर्च 

Advertisement

सुशांत कुरंगी /मिझोराम 

भारतातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिझोराम राज्याला नैसर्गिक देणगी लाभली आहे. परंतु घनदाट जंगल आणि नेहमीच दरड कोसळण्याची भीती असल्याने या ठिकाणी रस्ते व रेल्वे वाहतूक अद्याप म्हणावी तशी पोहोचली नव्हती. परंतु मागील अकरा वर्षांपासून सुरू असणाऱ्या प्रयत्नांना अखेर यश आले असून मिझोराम राज्यात रेल्वे पोहोचली आहे. आसाम ते मिझोराम असा खडतर रेल्वे मार्ग तयार करण्यात आला असून भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच ब्रिज देखील याच रेल्वे मार्गावर आहे.

Advertisement

देशाच्या पूर्व भागात असणाऱ्या मिझोराम राज्यातील बईरबी ते सायरंग नवीन रेल्वेमार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 सप्टेंबरला होणार आहे. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर मिझोराम (सायरंग) मध्ये पहिल्यांदाच रेल्वेसेवा येत आहे. 52.38 किलोमीटरचा हा मार्ग असून 8071 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनानंतर मिझोरामच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. मिझोराम राज्याची ओळख होण्यासोबत रेल्वेच्या या विशाल प्रकल्पाची माहिती देशभरात व्हावी यासाठी बेळगाव, हुबळी, बेंगळूरसह राज्यातील पस्तीस पत्रकारांना तीन दिवसांचा मिझोराम दौरा आयोजित केला होता. यावेळी रेल्वेच्या अधिकारी राधा राणी, पवन, रेल्वेची सीपीआरओ पिके शर्मा आदींनी याबद्दल माहिती दिली.

अकरा वर्षांपूर्वी प्रकल्पाला झाली होती सुरुवात

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 29 नोव्हेंबर 2014 रोजी मिझोराममधील बईरबी ते सायरंगपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 21 मार्च 2016 ला आसामपासून बईरबीपर्यंत रेल मार्गाला ब्रॉडगेजमध्ये परावर्तित करून पहिली मालगाडी मिझोराममधील बईरबीपर्यंत चालू करण्यात आली. 10 जून 2025 ला हरतकी रेल्वे स्टेशनपासून सायरंगपर्यंत रेल्वेसेवा सुरू करून आयझोल (मिझोरामची राजधानी) पहिल्यादा रेल्वे नेटवर्कने जोडली गेली.

या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान एकूण 45 भुयारी मार्ग, 153 रेल्वे ओव्हरब्रिज आहेत. लहान पुलांची संख्या 88 व आरयुबी 10 व मोठ्या पुलांची संख्या 55 इतकी आहे. एकूण 45 भुयारी मार्गांची लांबी 16 किलोमीटर इतकी आहे. बईरबी ते सायरंगपर्यंतचे अंतर 51.38 किलोमीटर इतके आहे. रेल्वेची गती क्षमता 100 किलोमीटर असून या दरम्यान हरतकी, कॉनपुई, मुअलखांग, सायरंग ही रेल्वे स्टेशन्स येतात. रेल्वे ट्रॅक पूर्णपणे जंगलातून जातो, यासाठी या मार्गावर बोगदे व मोठमोठे पूल बनविण्यात आलेले आहेत.

कोकण रेल्वेनंतर सर्वात मोठा प्रकल्प 

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यांतील कोकण रेल्वेचा प्रकल्प हा देशातील सर्वात अवघड रेल्वे प्रकल्प म्हणून ओळखला जात होता. डोंगरदऱ्यांमधून कोकण रेल्वे पोहोचवताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. त्यानंतरचा सर्वात अवघड रेल्वे प्रकल्प हा मिझोराम राज्यामध्ये राबविण्यात आला आहे. कोकण रेल्वे प्रमाणेच या ठिकाणी भुयारी रेल्वेमार्ग, प्रचंड मोठे ब्रिज तयार करण्यात आले आहेत. यासाठी कोकण रेल्वेचीही मदत घेतल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिझोरामच्या संस्कृती-पर्यटनाला चालना मिळेल

मागील अकरा वर्षांपासून खडतर प्रयत्नाने रेल्वेमार्गाचे निर्माण करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे मिझोराम राज्यातील संस्कृती व पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे ईशान्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी के. के. शर्मा यांनी सांगितले

-ईशान्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी के. के. शर्मा

Advertisement
Tags :

.