अब्जाधीश वसविणार देश
वृद्धत्वाला दूर ठेवण्याचा प्रयत्न
अमरत्वाची इच्छा प्रत्येकाची असते, परंतु एका अब्जाधीशाने आता अमरत्व मिळविण्याचा निर्धार केला आहे. या अब्जाधीशला आपण कधीच मरू नये असे वाटते. हा अब्जाधीश स्वत:चे तारुण्य टिकविण्यासाठी नवनवे प्रयोग करत आहे. या अब्जाधीशाने स्वत:च्या 17 वर्षीय मुलाचे रक्त स्वत:च्या शरीरात चढवून घेत आहे. याचबरोबर तो दररोज 110 गोळ्यांचे सेवन करतोय, जेणेकरून चेहऱ्यांवर सुरकुत्या निर्माण होऊ नयेत. आता या अब्जाधीशाच्या नव्या घोषणेने खळबळ उडाली आहे.
46 वर्षीय टेक दिग्गजाने आपण एक देश वसविणार असल्याचे आणि तेथे राहणारे लोक कधीच वृद्ध होणार नसल्याचा दावा केला आहे. या देशात राहण्यासाठी येणारा व्यक्ती अमर होईल असेही त्याने म्हटले आहे. अमेरिकेतील टेक टायकून आणि बायोहॅकर ब्रायन जॉन्सने अलिकडेच फ्लोरिडा लाइव्हलाँग कॉन्फरन्समध्ये भाग घेतला, यादरम्यान त्याने स्वत:ची योजना जगासमोर मांडली आहे.
मरू नका, कधीच मरू नका हा माझा मूलमंत्र असून तो आम्ही सिद्ध करूनच दाखवू. आतापर्यंत मी जे प्रयोग केले आहेत, त्यातून आम्ही वेगाने हा मंत्र पूर्ण करत आहोत हे स्पष्ट आहे. मी सध्या 46 वर्षांचा असलो तरीही माझ्या शरीरात आजही 22 वर्षीय युवकाप्रमाणे उत्साह आहे. माझे हृदय, फुफ्फुस सर्वकाही युवांप्रमाणे काम करत आहे. याचमुळे आम्ही आता एक अशा देश निर्माण करण्याचा विचार केला आहे, जेथे केवळ युवा लोकच राहू शकतील असे ब्रायन यांनी म्हटले आहे.
जंकफूडवर पूर्ण बंदी
आमच्या या देशात जंक फूडवर पूर्णपणे बंदी असणार आहे. तेथे मद्य मिळणार नाही. पिझ्झा, डोनेट्स यासारखे खाद्यपदार्थ मिळणार नाहीत. आम्ही तेथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मला प्राप्त होतेय त्याप्रमाणे आरोग्य सुविधा पुरविणार आहोत. तेथे दररोज शरीराची तपासणी होईल. तसेच डॉक्टर्स त्यावर देखरेख ठेवतील. लोकांचे वय कमी होईल अशाप्रकारची वैद्यकीय सुविधा दिली जाणार आहे. यामुळे लोक नेहमी युवा आणि स्वत:ला तंदुरुस्त राखू शकतील. जगातील अनेक लोकांना नेहमी तरुण रहायचे असते. आम्ही अशा लोकांसाठी एक नवे जग वसविण्याचे स्वप्न पाहत आहोत. या लोकांसाठी एक नवा देश निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे ब्रायन यांनी म्हटले आहे.
हा देश कुठे असेल?
देश स्थापन करण्यासाठी आम्ही जागेचा शोध घेत आहोत. सुरुवात ऑनलाइन जागतिक नेटवर्कद्वारे होणार आहे. यात दीर्घकाळ जिवंत राहण्याचे स्वप्न पाहणारे लोकच सामील होऊ शकतील. पहिल्या टप्प्यात नागरिकांची निवड केली जाईल. याकरता त्यांना एका तपासणी प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते. तारुण्यासह जगण्याची इच्छा का आहे हे लोकांना सांगावे लागणार असल्याचे ब्रायन यांनी सांगितले आहे.