देश बनला ‘काकडीवेडा’
हे जग अद्भूत लोकांनी भरलेले आहे. प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्या असते. पण त्यातही काही लोक आपल्या एखाद्याच कृतीमुळे अशी करामत करुन दाखवितात की इतर लोक त्यामुळे आचंबित होतात. एका स्वयंपाक्यामुळे एका देशात काकड्यांचा दुष्काळ पडला, ही घटना आपल्याला कदाचित खोटी वाटेल, पण तशी ती घडली आहे. काकडीपासून विविध चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ बनविणाऱ्या एका स्वयंपाक्याने इंटरनेटवर काकड्यांच्या विविध पदार्थांची पाककृती देण्यास काही दिवसांपूर्वी प्रारंभ केला होता. त्याच्या या पाककृती इतक्या लोकप्रिय ठरल्या, की आईसलंड या देशात बाजारात काकड्याच मिळेनाशा झाल्या आहेत.
आईसलंड हा देश आकाराने तसा मोठा असला तरी तरी तेथील लोकसंख्या अत्यंत अल्प आहे. अतिशीत हवामानामुळे त्या देशात फारसे कोणी रहावयास जात नाही. या देशात काकड्या याआधी फारशा लोकप्रिय नव्हत्या. पण या स्वयंपाक्याच्या पाककृतींमुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. इतकी, की काकड्या बाजारात येताक्षणीच विकल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे उशीरा बाजारात जाणाऱ्यांसाठी काकडी मिळेनाशी झाली आहे. लोगान मोफिट असे या स्वयंपाक्याचे नाव असून तो कॅनडा देशातील आहे. त्याने इंटरनेटवर प्रसिद्ध केलेल्या काकड्यांच्या पदार्थांच्या पाककृती अनेक देशांमध्ये लोकप्रिय होत आहेत. पण फारशी काकडी न खाणाऱ्या आईसलंड देशातील लोकांना मात्र, त्याने अक्षरश: ‘काकडीवेडे’ करुन सोडले आहे. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ अशी एक म्हण प्रचलित आहे. तिचाच हा प्रत्यय आहे, असे म्हणावे लागेल.