नगरसेवक जाणार 26 रोजी इंदूर अभ्यास दौऱ्यावर
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा इंदूर दौरा अखेर निश्चित झाला आहे. सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवक तर विरोधी गटातील लोकनियुक्त दोन नगरसेवक आणि सरकारनियुक्त दोन सदस्य या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत. 26 ते 30 ऑक्टोबर या काळात इंदूर दौऱ्यावर जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावर शिक्कामोर्तब झाले असून रविवार दि. 26 रोजी नगरसेवक व अधिकारी इंदूर अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. सर्व जण बेळगावातून गोव्याला जाणार असून तेथून विमानाने ते इंदूरला जाणार आहेत. अभ्यास दौरा संपवून गुरुवार दि. 30 रोजी पुन्हा सर्व जण बेळगावला परतणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये दरवर्षी देशात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या इंदूर शहरातील घन कचरा निर्मूलन व कचरा व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी बेळगावचे नगरसेवक तेथे जाणार आहेत. स्वच्छ भारत मिशनमधून 60 लाख रुपयांचा निधी अभ्यास दौऱ्यासाठीच राखीव असल्याने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीच सर्वसाधारण बैठकीत इंदूर अभ्यास दौऱ्याचा विषय मंजूर करण्यात आला होता.