For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा विरोधाभास!

06:30 AM Mar 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा विरोधाभास
Advertisement

इस्त्रायली महिलेवर सामूहिक बलात्काराबरोबरच गेल्या आठवडाभरात कर्नाटकात चित्रपट अभिनेत्रीकडून होणारे सोने तस्करी प्रकरण चांगलेच गाजते आहे. डीआरआयच्या (डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) अधिकाऱ्यांनी रन्या राव या अभिनेत्रीला अटक केली आहे.

Advertisement

कोप्पळ जिल्ह्यातील सानापूर येथे इस्त्रायली महिला व होम स्टे चालवणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हंपीपासून 26 किलोमीटर अंतरावर सानापूर आहे. याच ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या ओडिशातील एका पर्यटकाचा खून करण्यात आला आहे. हंपीसह कर्नाटकातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांची संख्या मोठी आहे. हंपी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाच्यावतीने 24 तास पोलिसांची गस्त असते. सानापूर, आनेगुंदी, विरुपापूरग•s ही निसर्गसंपन्न पर्यटनस्थळे पर्यटनाबरोबरच मौजमस्तीसाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाची ठिकाणे आहेत. सामूहिक बलात्कार व खुनाच्या घटनेनंतर या परिसरातही गस्त वाढवण्यात आली आहे. अशा घटनांमुळे विदेशी पर्यटकांमध्ये धास्ती वाढली आहे.

हंपी परिसरातील ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी येणारे पर्यटक स्वत:च पार्टीचे आयोजन करतात. अशा पार्ट्यांमध्ये अंमलीपदार्थांचा वापरही सर्रास होतो. हंपी परिसरात तर दारू, मांसविक्रीला बंदी आहे. पूर्वी गांजा व इतर अंमलीपदार्थ सहजपणे मिळायचे. विदेशी पर्यटकांसाठी तर रेव्ह पार्ट्यांचेही आयोजन व्हायचे. अलीकडच्या काही वर्षांत उघडपणे चालणाऱ्या या पार्ट्या बंद झाल्या आहेत. विदेशी पर्यटक पडेल तो दर देतात म्हणून त्यांना गांजासह अंमलीपदार्थ पुरविणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. केवळ हंपीच नव्हे तर कर्नाटकातील बहुतेक पर्यटनस्थळांवर सीसीटीव्हीची नजर असते. सानापूर, आनेगुंदी परिसरात कॅमेऱ्यांची संख्या नगण्य आहे. पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मते हंपी येथे येणाऱ्या विदेशी पर्यटकांना कसलीही भीती नाही. त्यांच्या सुरक्षेची पुरेपूर व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटक हंपीत सुरक्षित आहेत तर हंपीहून केवळ 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या सानापूर परिसरात असुरक्षित कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement

सानापूर येथील सामूहिक बलात्कार व पर्यटकाच्या खुनानंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणखी कडक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. अशी एखादी घटना घडल्यानंतर पोलीस दलाला जाग येते. तात्पुरती गस्त वाढविण्यात येते. नंतर ही व्यवस्था पुन्हा ढिली पडते. कर्नाटकातील अनेक ठिकाणे केवळ पर्यटनावर अवलंबून आहेत. बलात्कार, खुनासारख्या घटना घडू लागल्या तर साहजिकच पर्यटकांची संख्या मंदावते. एकदा त्यांच्या मनातील भीती वाढली की इतर राज्यांकडे त्यांचा कल वाढतो. त्यामुळे येथील अर्थकारणावरही त्याचा परिणाम होतो. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सानापूर येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अशा घटना टाळण्यासाठी गस्त वाढविण्याची सूचना पोलीस दलाला केली आहे. या ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी अनेकांना केवळ ही ठिकाणे पाहण्याबरोबरच मौजमजाही करायची असते. अंमलीपदार्थांचे सेवन करायचे असते. अशा पर्यटकांवरही प्रशासनाने नजर ठेवण्याची गरज आहे.

इस्त्रायली महिलेवर सामूहिक बलात्काराबरोबरच गेल्या आठवडाभरात कर्नाटकात चित्रपट अभिनेत्रीकडून होणारे सोने तस्करी प्रकरण चांगलेच गाजते आहे. डीआरआयच्या (डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) अधिकाऱ्यांनी रन्या राव या अभिनेत्रीला अटक केली आहे. दुबईमधून तिने आणलेले 14 किलोहून अधिक सोने जप्त करण्यात आले आहे. सीबीआयनेही या प्रकरणाची चौकशी हाती घेतली आहे. कर्नाटकातील दोन प्रभावी मंत्री व काही अधिकाऱ्यांची नावेही या प्रकरणात ठळक चर्चेत आली आहेत. रन्या ही आयपीएस अधिकारी डॉ. के. रामचंद्र राव यांची मुलगी आहे. पोलीस दलातील वडिलांचा दबदबा रन्याने सोने तस्करीसाठी वापरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रामचंद्र राव यांचीही चौकशी होणार आहे. पोलीस एस्कॉर्टमध्ये रन्या विमानतळावरून घरी जायची. विमानतळावर तिची तपासणीही होत नव्हती. या प्रकरणाशी आपला काही एक संबंध नसल्याचे रामचंद्र राव यांनी जाहीर केले असले तरी त्यांच्या दबदब्याचा वापर करूनच त्यांची सावत्र मुलगी असणाऱ्या रन्याने सोन्याची तस्करी केली आहे.

3 मार्च रोजी बेंगळूर विमानतळावर रन्या रावला अटक झाली आहे. तिच्याकडून 12 कोटी 56 लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात रन्याने वीसहून अधिक वेळा दुबईचा दौरा केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एक किलो सोने पोहोचविल्यानंतर तिला चार लाख रुपये मिळतात. तिच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी 2 कोटी 67 लाख रुपये रोकड व 2 कोटी 6 लाख रुपयांचे सोने मिळाले. रन्या सोन्याची तस्करी करायची तर ही गोष्ट बेंगळूर येथील अधिकाऱ्यांना कशी कळाली नाही? डीआरआयच्या दिल्लीच्या पथकाने तिला अटक केली आहे. विमानतळावर एखाद्या सामान्य व्यक्तीची काटेकोर तपासणी केली जाते. तस्करांना मोकळी सूट का मिळते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर रन्याला ताब्यात घेतले, त्यावेळी तिने त्वरित ‘मिनिस्टर अंकल’ना फोन लावते असे सांगितले. तिला सांभाळणारे मिनिस्टर अंकल कोण? राज्य सरकारमधील किती मंत्री व अधिकारी सोने तस्करीत गुंतले आहेत? याचाही खुलासा व्हायला हवा. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारने ती नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या शिष्टाचाराआडून सोने तस्करी केली जात होती. रन्या ही डॉ. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. तिच्या व्यवहाराशी आपला काही एक संबंध नसल्याचे ते सांगत असले तरी विमानतळावर आयपीएस अधिकाऱ्यांसाठी असलेल्या शिष्टाचाराआडूनच रन्या सहजपणे दुबईहून आणलेल्या सोन्यासह बाहेर पडत होते. तिची चौकशी केली जात नव्हती. इतर प्रवाशांसाठी असणारे निर्बंध तिच्यासाठी नव्हते. आयएएस, आयपीएस अधिकारी व राजकीय नेत्यांसाठी काही शिष्टाचार असतो. त्यांच्यासाठी विमानतळावर स्वतंत्र प्रवेशद्वारही असते. याच प्रवेशद्वारातून खुलेआम सोन्याची तस्करी केली जात होती. विमानतळावरून आल्यानंतर पोलीस वाहनातून ती घरी जायची. याचाच अर्थ सोने तस्करीसाठी पोलीस यंत्रणेचाही पुरेपूर वापर करण्यात आला आहे.

डॉ. के. रामचंद्र राव हे बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक होते. बेळगावमधून त्यांची उचलबांगडी का केली? याचीही चौकशी व्हायला हवी. विजापूर जिल्ह्यातील धर्मराज चडचण याचा एन्काऊंटर झाला. त्याचा भाऊ गंगाधर चडचणला पकडून पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधकांच्या आयता सोपविला. महादेव सावकार भैरगोंडच्या समर्थकांनी गंगाधरचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे भीमा नदीत टाकले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांना अटक झाली. त्यांच्यावर एफआयआरही दाखल झाला आहे. हा प्रकार घडला, त्यावेळी रामचंद्र राव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक होते. राज्य सरकारने हा सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली केली. या प्रकरणाची चौकशी झाली तरी आजही अनेक अधिकारी अडचणीत येणार, हे स्पष्ट आहे. आता सोने तस्करी प्रकरणात रामचंद्र राव यांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. डीआरआय, सीबीआयबरोबरच आता सीआयडीही या प्रकरणाच्या तपासात उतरली आहे. सोने तस्करीत कोण कोण सहभागी आहेत? त्यांची पाळेमुळे खणली जाणार का? हे पहावे लागेल.

Advertisement
Tags :

.