संविधान समस्त भारतीयांचे मार्गदर्शक!
गोवा विद्यापीठ मैदानावर 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा
पणजी : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय संविधानाच्या ऊपात दिलेला दस्तावेज हा केवळ कायद्याशी संबंधित दस्तावेज नाही. ‘आम्हा भारतीय लोकांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचे जतन करणारी घटना म्हणजे देशाची आदर्शवादी राज्यघटना आहे’, असे डॉ. आंबेडकर यांनी देशवासीयांना संविधान सुपूर्द करताना सांगितले होते. देशातील जनतेला संविधानाशिवाय पर्याय नसून, देशवासीयांना मार्गदर्शक म्हणून संविधानाचे फार मोठे महत्त्व आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.
गोव्याच्या राजभवनमार्फत 50 गरीब व गरजू लोकांना दररोज अन्नदान करण्याची योजना सुरू केलेली आहे. यापुढे अन्नाबरोबरच गरजू लोकांना कपडेही पुरविण्यात येणार आहेत. गोव्यातील लोकांनी राज्यात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच प्रगती व समृद्धी यासाठीही योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल पिल्लई यांनी केले.
अधिकाऱ्यांना ‘मुख्यमंत्री पुरस्कार’
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते उच्च शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, पोलिस अधीक्षक अक्षत कौशल आणि प्रधान मुख्य वनपाल प्रवीण कुमार राघव यांना ‘मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला.