भ्रष्टाचारासाठीच काँग्रेस पक्ष अस्तित्वात!
बी. वाय. विजयेंद्र यांची टीका : दुसऱ्या टप्प्यात बेळगावात जनआक्रोश यात्रा
बेळगाव : भ्रष्टाचारासाठीच काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सिद्धरामय्या यांनी भ्रष्टाचार सुरू ठेवला आहे. त्यांच्या कार्यकाळात 50 हून अधिक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली. बसवेश्वर सर्कलमध्ये जनआक्रोश यात्रेला चालना दिल्यानंतर ते म्हणाले, काँग्रेस सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविण्यात आले आहेत. याविरोधात भाजप जनआक्रोश यात्रा काढत आहे. अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असलेले 36 हजार कोटी रु. अनुदान सरकारने रोखून धरले आहे. मुस्लिमांना टेंडरमध्ये 4 टक्के आरक्षण दिले आहे.
विदेशात शिक्षणासाठी मुस्लीम विद्यार्थ्यांना प्रोत्साहनधन देण्यात आले आहे. गरीब मुस्लीम महिलांना विवाहासाठी 50 हजारांची मदत दिली जात आहे. हिंदूंमध्ये गरीब महिला नाहीत का?, असा सवाल बी. वाय. विजयेंद्र यांनी उपस्थित केला. काँग्रेसने देशावर 65 वर्षे सत्ता चालविली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वत:ला देशाचे युवराज म्हणवून घेतले आहे. स्वातंत्र्यसैनिकांकडून स्थापन केलेले नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र गांधी कुटुंबाने आपल्या ताब्यात घेतले. अंमलबजावणी संचालनालयाच्या पारदर्शक तपासातून सोनिया आणि राहुल गांधी यांनी केलेली लूट उघडकीस आली, असे ते म्हणाले.
पुढील निवडणुकीत काँग्रेसची 35 जागांवर घसरण : शेट्टर
खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, 2028 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची 35 जागांवर घसरण होईल, हे निश्चित आहे. सिद्धरामय्या यांनी प्रशासनावरील आपली पकड गमावली आहे. त्यांचा राजकीय शेवट सुरू झाला आहे. सिद्धरामय्या हे काँग्रेस पक्षाचे शेवटचे मुख्यमंत्री असतील, अशी टिप्पणी त्यांनी केली.
बसवेश्वर सर्कलमध्ये चालना
राज्य काँग्रेस सरकारविरोधात बेळगावमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्त्वाखाली दुसऱ्या टप्प्यातील जनआक्रोश यात्रा काढण्यात आली. गोवावेस येथील बसवेश्वर सर्कलपासून रॅलीला प्रारंभ झाला. नाथ पै सर्कल, शहापूर खडेबाजार, शिवसृष्टी या मार्गावर रॅली काढली. शिवसृष्टी येथे रॅलीचा समारोप झाला. काँग्रेस सरकार विरोधात घोषणाबाजी केली. जनआक्रोश यात्रेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधानपरिषद विरोधी नेते चलवादी नारायणस्वामी, गोविंद कारजोळ, यदूवीर वडेयर, बी. श्रीरामुलू, आमदार भालचंद्र जारकीहोळी, शशिकला जोल्ले, दुर्योधन ऐहोळे, विठ्ठल हलगेकर, हनुमंत निराणी, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी मंत्री महादेवप्पा यादवाड, डॉ. विश्वानाथ पाटील, माजी आमदार संजय पाटील, महांतेश दोडगौडर आदी सहभागी झाले होते.