मध्यपूर्वेतील संघर्ष धोकादायक वळणावर
अपेक्षेप्रमाणे रविवारी इस्त्रायलच्या लष्करी व गुप्तचर स्थळांवर आजवरच्या संघर्षातील सर्वात मोठा हल्ला केला. त्यानंतर इस्त्रायलने लेबनॉनवर जोरदार हवाई प्रतिहल्ला करीत हिजब्बुल्लाहच्या तळांना लक्ष्य केले. या घटनेनंतर एकंदर पाहता मध्यपूर्वेतील संघर्ष काही थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. युद्धविरामासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरु असून त्याला आता यश मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
इस्त्रायल आणि हमास संघर्षात आता लेबनॉनच्या ‘हिजबुल्लाह’ या दहशतवादी संघटनेने प्रथमच मोठा आणि सक्रिय सहभाग दर्शविला आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेच्या इस्त्रायलवरील हल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिजबुल्लाहने हमासला साथ देत इस्त्रायलमधील अनेक ठिकाणी गोळीबार केला होता. त्यानंतरच्या काळात या संघटनेने उत्तर इस्त्रायल आणि गोलन टेकड्यांवरील इस्त्रायली तळांना लक्ष्य केले होते. प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलनेही हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई आणि तोफ हल्ले केले. अशा चकमकी सुरु असल्या तरी हिजबुल्लाह आणि इस्त्रायल परस्परांविरुद्ध थेट आणि मोठा संघर्ष करण्यास धजावत नव्हते.
हिजबुल्लाह अर्थात ‘अल्लाहया पक्ष’ हे नाव धारण करणाऱ्या या संघटनेचा उदय इस्त्रायलने 1982 साली पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांच्या हल्यास उत्तर म्हणून जेव्हा लेबनॉनमध्ये सैन्य घुसवले त्यानंतर झाला. स्वाभाविकच ‘इस्त्रायलला नष्ट करणे’ हा या संघटनेच्या कार्यक्रम पत्रिकेवरील अग्रक्रमांकाचा विषय आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस इस्त्रायली हल्यात लेबनॉनचा वरिष्ठ लष्करी अधिकारी फौआद शुकर ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहने या घटनेचा सूड घेण्याचे वचन दिले होते. त्यानुसार हिजबुल्लाहचा इस्त्रायलवर मोठा हल्ला अपेक्षित होता.
अपेक्षेप्रमाणे रविवारी इस्त्रायलच्या लष्करी व गुप्तचर स्थळांवर आजवरच्या संघर्षातील सर्वात मोठा हल्ला केला. त्यानंतर इस्त्रायलने लेबनॉनवर जोरदार हवाई प्रतिहल्ला करीत हिजब्बुल्लाहच्या तळांना लक्ष्य केले. हल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हिजबुल्लाह आणि तिचा पाठिराखा इराण यांना उद्देशून, ‘आमचे प्रत्युत्तर हे उत्तरेकडील परिस्थिती बदलण्यासाठीचे व आमच्या विस्थापित नागरिकांना सुरक्षित घरी परतू देण्यासाठीचे आणखी एक पाऊल आहे. मात्र एवढ्यावरच ही गोष्ट संपणार नाही हे ध्यानात घ्या’, अशी स्पष्ट तंबी दिली. विशेष म्हणजे, हा ताजा युद्धज्वर अशावेळी उफाळून आला आहे जेव्हा अमेरिका तिच्या प्रादेशिक मित्रांसह इस्त्रायल-हमास युद्धविरामासाठी बोलणी करीत आहे.
अमेरिका, इजिप्त आणि कतार या देशांनी गाझामध्ये युद्धविराम करार करण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न चालवले आहेत. हमासने ताब्यात घेतलेल्या इस्त्रायली ओलिसांची सुटका आणि गाझा व इतर भागातील तणाव दूर करण्याचा हेतू त्यामागे आहे. जर युद्ध विराम झाला तर इस्त्रायली सीमावर्ती प्रदेशातील हल्ले आपण थांबवू असे हिजबुल्लाहचे म्हणणे आहे. शुकर आणि हमास म्होरक्या हानिया यांच्या हत्येनंतर हिजबुल्लाह आणि इराण इस्त्रायलवरील हल्ले थांबवतीलच याची शाश्वती नसली तरी दोघांनाही युद्धविराम करारात व्यत्यय आणू द्यायचा नाही असे सध्या तरी दिसते. मात्र सारी मुत्सद्देगीरी पणास लावूनही वाटाघाटीत महत्त्वपूर्ण मुद्यांवर अद्याप सहमती झालेली नाही.
गाझामधील सामरीकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा दोन प्रदेशांवर इस्त्रायलचे कायमस्वरुपी अस्तित्व ही इस्त्रायलची ताजी मागणी हमास व इजिप्तने फेटाळली आहे. अशी अनिर्णित स्थिती असताना नव्याने होणारे हल्ले हा आंतरराष्ट्रीय शांतता प्रयत्नांना बसलेला जबर धक्का आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या इस्त्रायलच्या सहानुभूतीदार देशांना यामुळे हताशा आली आहे. विशेष म्हणजे अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद सोडताना या संघर्षावर व्यापक आणि दीर्घकालीन तोडगा काढण्याची जी इच्छा होती ती पूर्णत्वास जाण्याची चिन्हे नाहीत.
एकीकडे हमासची अडवणूक तर दुसरीकडे इस्त्रायलच्या नव्या मागण्या अशा दुराग्रहामुळे युद्धस्थिती निवळण्याऐवजी भडकत चालली आहे. हमास आणि हिजबुल्लाह या संघर्षरत असलेल्या दोन्ही संघटनांना इराणचा पाठिंबा आहे. गेल्या एप्रिल महिन्यात इस्त्रायलवर क्षेपणास्त्रे व ड्रोन्सद्वारे हल्ला करुन इराणने आपण प्रेक्षकाच्या भूमिकेत नाही हे दर्शविले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाता, इराणसह त्याची दोस्त राष्ट्रे येमेन, सिरिया आणि इराक युद्धात उतरतील. इस्त्रायलच्या बाजूने अमेरिका आणि तिचे मित्र देशही युद्धात ओढले जाऊन संघर्षाचे रुपांतर महायुद्ध सदृष्य परिणामात होईल. इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्ला अली खामेनी यांनी हानियाच्या हत्येनंतर इस्त्रायलला सजा देण्याची धमकी दिली होती. हिजबुल्लाह-इस्त्रायल यांच्यातील नव्या हल्या-प्रतिहल्यामुळे इराणी आक्रमणाच्या शक्यता बळावल्या आहेत.
इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी, हमासचा नवा म्होरक्या याह्या सिनवर व हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाह हे तिघेही क्रूर व कट्टरतावादी प्रवृत्तीचे आहेत. तणाव व संघर्षमय वातावरणावरच त्यांचे भरण पोषण झालेले आहे. दीर्घकालीन शांततामय स्थितीत ते प्रमुखपदी राहूच शकणार नाहीत ही कालानुरुप निर्माण झालेली अपरिहार्यता आहे. दुसऱ्या बाजूने इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या युद्धविराम आणि शांतताविषयक प्रयत्नांसंबधी खुद्द इस्त्रायली जनतेतंच साशंकता आहे. तेथील जनमत चाचण्यांतून असे दिसून येते की, बहुसंख्य इस्त्रायली नागरिकांना हमासकडे असलेल्या इस्त्रायली ओलिसांची सुटका हवी आहे. या बदल्यात पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका व युद्धविराम अशा तडजोडीस ते तयार आहेत.
तथापि, कमी संख्येतील तरीही लक्षणीय आणि प्रभावशाली अशा इस्त्रायली नागरिकांना असे वाटते की, ‘ओलिसांकडे’ युद्धाचा सर्वकष उद्देश साधण्यासाठी केलेला त्याग म्हणून पाहिले जावे. पंतप्रधान नेतान्याहू यांच्या ओलिसांबाबतच्या ताठर व हटवादी भूमिकेमुळे सर्वसामान्य इस्त्रायली नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास डळमळीत झाला आहे. हमास, हिजबुल्लाहच्या हल्याने मृत्यू, विस्थापन व आर्थिक हानी तर झालीच आहे. शिवाय केव्हा, कोणाकडून हल्ला होईल याचा नेम नसल्याने एक प्रकराची अनिश्चितता व भीती इस्त्रायली नागरिकांत पसरली आहे.
हमासचा विनाश आणि संपूर्ण विजय हा नेतान्याहू यांचा नारा असल्याने युद्ध लांबत चालले आहे. त्यांच्या देशातील सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी अधिकाऱ्यांची नाराजी देखील लांबलेल्या युद्धामुळे वाढते आहे. इस्त्रायलचा आरंभापासूनचा शस्त्र पुरवठादार व रक्षणकर्ता असलेल्या अमेरिकेचे संबंध नेतान्याहू यांच्या युद्धकालीन कार्यपद्धतीमुळे प्रथमच नीचांकी पातळीवर गेले आहेत. जो बायडेन यांनी त्यांच्याबद्दलची नाराजी वारंवार सूचित केली आहे. स्वत: नेतान्याहू आणि त्यांचे पंतप्रधानपद संसदेतील मोजक्या कट्टरवादी सहकाऱ्यांच्या पाठिंब्यावर तगून आहे. सत्तेतून बाहेर पडल्यास भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाण्याची खात्री असल्याने त्यांना शांतता प्रस्थापित होऊ नये असे वाटते. एकंदरीत युद्धात सहभागी साऱ्याच युद्धखोर नेत्यांचे अस्तित्व ते सुरु असण्यावरच विसंबून असल्याने या युद्धास पूर्णविराम मिळण्याची शक्यता दूरावत आहे. या युद्धात सुमारे 40 हजार पॅलेस्टिनी आणि 1200 इस्त्रायलींचे बळी गेले आहेत. दोन्हीकडील नेत्यांच्या कर्माचे भोग निरपराध नागरिक भोगत आहेत.
-अनिल आजगांवकर