त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभदिनी काकड आरतीचा समारोप
कट्टा येथे दीपोत्सव, लग्नसोहळा, दिंडी निशाण सोहळ्याचे आयोजन
कट्टा / वार्ताहर
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील श्री विठ्ठल रखुमाई - लक्ष्मी नारायण मंदिरात सुरुवात झालेल्या काकड आरतीचा त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. यावेळी भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली होती. समारोपाच्या दिवशी प्रत्येक भक्ताला मंदिरात आरतीचा मान देण्यात आला. त्यामुळे प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. समारोप दिनी श्री विठ्ठल रखुमाई - लक्ष्मी नारायण मंदिरात भव्य दिव्य असे धार्मिक परंपरा जपण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अनेक ठिकाणी दीपोत्सवाला विशेष महत्व दिले जाते. त्या दीपोत्सवाचे काकड आरती समारोपाच्या निमित्ताने पांडुरंगाच्या मंदिरात भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजारपेठेतील महिलांनी आकर्षक अशा विविध रंगीबेरंगी रंगांच्या रांगोळ्या काढून मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर टाकली. त्या आकर्षक रांगोळ्यानी कार्यक्रमांची शोभा अधिकच वाढली. सायंकाळी मंदिरात प्रकाश म्हाडगुत व गायत्री म्हाडगुत या दाम्पत्याच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा करून देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी, बाजारपेठेतील जेष्ठ मंडळी यांच्या हस्ते दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थित असलेल्या असंख्य भाविकांनी मंदिरात व मंदिराच्या चहुबाजूंनी दिव्यांची रोषणाई केली. यामुळे मंदिराचे रूप अधिकच खुलून दिसत होते. मंदिरात पांडुरंगाची महाआरती करण्यात आली यानंतर वाजत गाजत हरिनामाच्या जयघोषात मंदिराच्या सभोवती दिंडी निशाण काढण्यात आले. तसेच यावेळी पुरोहितांच्या पौरोहित्याखाली देवांचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्न सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. यामध्ये महिला वर्गाची विशेष उपस्थिती दिसून आली. या सर्व धार्मिक कार्यक्रमांनी मंदिरातील सोहळ्याचा समारोप करण्यात आला.