For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परतावा देण्याची वेळ येताच कंपनीच केली बंद!

11:54 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
परतावा देण्याची वेळ येताच कंपनीच केली बंद
Advertisement

टिळकवाडीतील निवृत्त अधिकाऱ्याला 32 लाखांचा चुना : सायबर क्राईम विभागाकडे तक्रार

Advertisement

बेळगाव : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, गुंतवणुकीच्या अनेक पटीने परतावा मिळवा, असे सांगत सावजांना ठकवण्याचे प्रकार सुरूच आहेत. सायबर क्राईम विभागाकडून यासंबंधी वारंवार जागृतीची मोहीम राबवूनही फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. टिळकवाडी येथील एका निवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 32 लाख रुपयांना ठकवल्याची माहिती उघडकीस आली आहे. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या फ्लॅटफॉर्मचा वापर करून गुन्हेगार सावजांना गळ घालतात. यासाठी अनेक गुंतवणूक तज्ञांचे व्हिडिओही दाखवले जातात. प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांचाही व्हिडिओ दाखवून गुंतवणूक कशी करायची, त्यातून फायदा कसा मिळवायचा? याविषयी मार्गदर्शन करून सावजांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे उघडकीस आले आहे. अमानसा या कंपनीच्या नावाने ही फसवणूक झाली आहे. जयकुमार वर्मा हा या कंपनीचा प्रमुख होता.

बेळगाव येथील गुंतवणूकदारांबरोबर तो संपर्कात होता. त्याच्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी एका निवृत्त अधिकाऱ्याने त्याच्या कंपनीत एकूण 32 लाख 20 हजार रुपये गुंतवणूक केली. परतावा देण्याची वेळ आली त्यावेळी कंपनीच बंद झाली. जयकुमार वर्मा ज्या मोबाईल क्रमांकावरून संपर्कात होता, त्या क्रमांकावर सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्याचा उपयोग झाला नाही. त्याचा मोबाईल बंद होता. आपण फसलो गेलो, हे लक्षात येताच त्या निवृत्त अधिकाऱ्याने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली आहे. बेळगाव येथील गुंतवणूकदाराला जयकुमार वर्माने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची? याविषयी दोन पुस्तकेही पाठवून दिली होती. अमानसा-पीटीई ही कंपनी बंद झाल्यानंतर लगेच एएमई-पीटीई ही कंपनी त्याच गुन्हेगारांनी सुरू केली. त्यांच्या वेबसाईटमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला असता तो शक्य झाला नाही. 32 लाख 20 हजार रुपये गुंतवणुकीच्या बदल्यात अमानसा कंपनीकडून या निवृत्त अधिकाऱ्याला 67 लाख 39 हजार रुपये परतावा मिळायला हवा होता. ज्यावेळी परतावा देण्याची वेळ आली, त्यावेळी कंपनीच बंद झाली.

Advertisement

सावजांना ठकविण्याचे प्रकार सुरूच

अत्यंत व्यवस्थितपणे व नियोजनबद्धरीत्या बेळगाव येथील गुंतवणूकदाराची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांनी गुंतवणूकदाराच्या नावे उघडलेल्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर ही रक्कम परत मिळवण्यासाठी 7 लाख रुपये टॅक्स भरा, टॅक्स भरल्यानंतर तुमची रक्कम तुम्हाला परत मिळते, असा विश्वास देण्यात आला. या भामट्यावर विश्वास ठेवून या निवृत्त अधिकाऱ्याने सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बँक खात्यात शेवटचे 7 लाख रुपये भरले. त्यानंतर ते अकाऊंटच बंद झाले. डिजिटल अरेस्ट व शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाने मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू असून वेगवेगळे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून सावजांना ठकविण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे सायबर क्राईम विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

Advertisement
Tags :

.