For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मैदानाला रंग चढू लागला

06:06 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मैदानाला रंग चढू लागला
Advertisement

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला आता रंग चढू लागला आहे. निवडणूक मैदान आता सजू लागले आहे. महायुतीचा घटक पक्ष भारतीय जनता पक्षाने आपली 93 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन आघाडी घेतली आहे. महायुतीचा दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने थेट एबी फॉर्म देत 38 जणांना उमेदवारी तिकीट देऊ केले आहे तर तिसरा घटक पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी आपली 45जणांची यादी जाहीर केली. यादीवर घराणेशाहीचा छाप आहेच. दरम्यान महाआघाडीकडून अद्याप कोणाच्याही उमेदवारीची वा यादीची घोषणा झालेली नाही पण आम्ही एबी फॉर्म दिलेत असे संजय राऊत सांगत आहेत. महाआघाडीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला अशा वार्ता आहेत. तसेच मुंबईत काही जागांवर मतभेद असल्याचे सांगितले जाते आहे. ठरलेल्या

Advertisement

फॉर्म्युल्यानुसार कॉंग्रेस 105 जागा ठाकरे गट 95 जागा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 84 जागा मिळणार आहेत. बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी आघाडीच्या याद्या येण्यास प्रारंभ होईल आणि मग तिकीट नाकारलेले, युती, आघाडी शिवाय अन्य पर्याय शोधतील, जरांगेच्या मराठाशक्तीचे आणि तिसऱ्या महापरिवर्तन महाशक्तीचे उमेदवारही अद्याप जाहीर झालेले नाहीत. बंडखोर आणि एमआयएम, वगैरेही भिडू लढाईच्या पवित्र्यात आहेत. मनसेने काही उमेदवार जाहीर केले व सुमारे शंभर जागा लढवणार असे सांगितले आहे. एकुणच सत्तासंघर्षाचे मैदान आकारु लागले आहे. सजू लागले आहे. महायुतीने लोकसभेवेळची चूक यावेळी दुरुस्त केली आणि मित्र पक्षात समन्वय ठेवत, प्रसंगी एकमेकांना उमेदवार देत उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली. तथापि या बाबतीत महाआघाडीत तूटणार काय इतके ताणले गेल्याने यादी तर जाहीर झाली नाहीच पण कॉंग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात ताण निर्माण झाला. कॉंग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी आपले प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना मागे ढकलून शिवसेना ठाकरे गटासमोर मान तुकवली व विदर्भासह महाराष्ट्रातील शिवसेनेला हव्या असलेल्या जागा देणेसाठी मान डोलावली, असे प्रारंभिक चित्र दिसते आहे. संपूर्ण तिकीट वाटप आणि बंडाचे झेंडे बघून यावर मत मांडता येईल पण आज तरी कॉंग्रेस हायकमांडने प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना मागे ढकलत उद्धव ठाकरे यांची मैत्री महत्त्वाची ठरवली आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे पक्षाचे व कार्यकर्त्यांचे हित बघणे हे कर्तव्य आहे. त्या कर्तव्य भावनेतून त्यांनी कॉंग्रेसला सुमारे 125 ते 130 जागा मागितल्या होत्या.

कॉंग्रेसच आघाडीत जागावाटपात मोठा भाऊ अशी स्पष्ट भूमिका घेतली होती आणि कुणाच्या किती जागा येतात हे बघून ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री असे ठणकावले होते. पण ठाकरे यांनी चेहरा जाहीर करा, मोठा भाऊ कोण ते सांगा असे म्हटले होते. कॉंगेस विदर्भातील एकही जागा ठाकरेंना सोडायला तयार नव्हती, जोडीला कॉंग्रेसची मुंबईतील शक्ती ठाकरेंच्या पाठी उभी करताना मुंबईत कॉंग्रेसने जागावाटपात चांगला हिस्सा मागितला होता. नाना पटोले चर्चेला व भूमिकेला चिकटून होते पण शिवसेनेने आघाडीतून बाहेर पडू इतके ताणले, पटोले चर्चा करणार तर शिवसेना चर्चेला येणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर दिल्लीत कॉंग्रेस हायकमांडने बैठक घेतली व नाना पटोले यांना मागे खेचत, बाळासाहेब थोरात यांना समन्वयक म्हणून मातोश्रीवर पाठवले. आता कॉंग्रेसने 105 जागा लढवाव्यात आणि ठाकरे शिवसेनेने 95 असे काही ठरते आहे. पण हे आकडे अंतिम नाहीत. कॉंग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष आपल्या प्रदेश अध्यक्षाला मागे खेचून शिवसेना ठाकरे गटाच्या हो ला हो करतो आहे त्यामागे कॉंग्रेस हायकमांडची काही भूमिका असावी, रणनीती असावी. एकतर कॉंग्रेसला काहीही करुन भाजपाला रोखायचे आहे. महाराष्ट्रासारखे मोठे व देशाची आर्थिक राजधानी असलेले राज्य भाजपाकडे जावू द्यायचे नाही, त्यासाठी काहीही अशी हायकमांडची भूमिका असू शकते. सोबत जागा कमी मिळाल्या तर सांगली पॅटर्न करुन म्हणजे बंडखोरी करुन आपले उमेदवार निवडून आणायचे, असेही ठरु शकते. लोकसभेच्या वेळी सांगलीत शिवसेनेची ताकद नसताना शिवसेनेने एकतर्फी आपला उमेदवार जाहीर केला आणि तो उमेदवार रेटला पण

Advertisement

कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार उभा केला व निवडून आणला आणि त्यास पक्षात सहभागी केले. कदाचीत हाच फॉर्म्युला कॉंग्रेस विदर्भात वापरू शकते, त्याच हेतूने पटोले यांना

कॉंग्रेसने मागे खेचले असावे. कॉंग्रेस हायकमांडची ही रणनीती असू शकते पण त्यातून मेसेज चांगला गेलेला नाही. सांगली पॅटर्नमुळे पक्षाची विश्वासार्हता उरत नाही. आघाडीधर्माचे पालन होत नाही आणि प्रदेश अध्यक्ष या मानाच्या पदाचे महत्त्व

कॉंग्रेसश्रेष्ठीच्या लेखी काय आहे हे पण दिसून येते. महाआघाडी व महायुती काही जागांवर वाद आहेत. ते शेवटपर्यंत राहणार पण ताळमेळ घालत, समजूतीने पावले टाकणे ही गरज असते. त्यात जो यशस्वी झाला त्याने अर्धे यश मिळवले असे मानले जाते कारण फार ताणले की कार्यकर्ते संतापतात, राग धरतात आणि सुडाची भावना बाळगतात. त्यातच ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे सुत्र असल्याने पाडापाडीचे उद्योग होतातच. जोडीला मुख्यमंत्री पदाचे दावेदार हमखास अडचणीत आणले जातात. आता एक दोन दिवसात जागावाटपाच्या याद्या जाहीर होतील, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात मोठी फूट आणि व्हेकन्सी निर्माण झालेने दोन्ही पक्षात इनकमिंग मोठ्या प्रमाणात केले जात आहे. शरद पवारांनी माणसे हेरुन गावोगावी हिंडून बरीचशी भरती केली. तुलनेने उद्धव ठाकरे फारसे हिंडलेले नाहीत. शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे पण ते शरद पवारांप्रमाणे हेरुन नाही. बुधवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची  65 उमेदवारांची यादी जाहीर केली. शिवसेनेची सर्व ताकद मोठा भाऊ आणि चेहरा यासाठी काम करताना दिसते आहे आणि या दोन्ही मुद्यावर शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. येत्या दोन तीन इतर मेदवार जाहीर होतील, अर्ज दाखल केले जातील, लहान मोठ्या बंडखोऱ्या होतील आणि अर्जमाघारी नंतरच चित्र स्पष्ट होईल तूर्त निवडणूक मैदान सजू लागले आहे.

Advertisement
Tags :

.