आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला ठोकले टाळे: अधिकारी आत अडकले
सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मराठा आंदोलकांनी टाळे लावत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटलाच टाळे लावल्याने जिल्हाधिकारी यांच्यासह बहुतांश अधिकारी व कर्मचारी अनेक तास कार्यालयातच अडकून पडले.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यात दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे. सोलापूर जिल्हाभरात याचे नीव पडसाद उमटत आहेत. सोमवारी दिवसभरात आरक्षणासंदर्भात सरकाकडुन कोणताही ठोस निर्णय न झाल्याने राज्यात याविरुध्द नीव पडसाद उमटत आहेत.सोमवारी सोलापूर जिल्ह्यात एसटी बस पेटवण्यात आली, पुणे व अक्कलकोट या महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. मंगळवारीही आंदोलक आरक्षणासाठी अधिक आक्रमक होताना दिसून आले.
सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, भाजपचे अनंत जाधव, दास शेळके, शिवसेना ठाकरे गटाचे प्रताप चव्हाण, काँग्रेस पक्षाचे सुनील रसाळे, महेश धाराशिवकर, श्रीकांत घाडगे यांच्यासह मराठा समाजातील बांधवानी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे लावले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यात आले.