जुना धारवाड रोड येथील कोसळलेले काँक्रिट धोकादायक
बेळगाव : जुना धारवाड रोड येथील रुपाली कन्व्हेंशन हॉलसमोर गटारीवरील काँक्रिट कोसळल्याने अनेक अपघात होत आहेत. भरधाव वाहने या गटारीमध्ये अडकून अपघात होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. गुरुवारी एका लग्नासाठी आलेली महिला दुचाकीसह या खड्ड्यामध्ये कोसळून जखमी झाली. त्यामुळे महानगरपालिकेने तात्काळ या ठिकाणी दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे. वर्दळीच्या असलेला जुना धारवाड रोड येथे अनेक समस्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल ज्या ठिकाणी संपतो, त्याच ठिकाणी रस्त्याशेजारी गटारीवरील काँक्रिट कोसळले आहे. एखादे अवजड वाहन गटारीवरून जाताना हे काँक्रिट कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, यामुळे दुचाकीचे अपघात होत आहेत. रुपाली कन्व्हेंशन हॉल येथे मंगल कार्यालय असल्याने दररोज नागरिकांची ये-जा असते. रात्रीच्या वेळी गटारीवरील कोसळलेले काँक्रिट दृष्टीस न पडल्याने अपघात होत असून तातडीने या ठिकाणी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील व्यापारी तसेच नागरिकांकडून केली जात आहे.