थंडी अजुनही गायबच
कोल्हापूर :
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढला होता. पण समुद्रकिनार पट्टीवरील फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे गत आठवड्यापासून थंडी गायब झाली होती. अजुनही वातावरणातील उष्मा कायम असुन थंडी गायबच आहे.
सकाळी किंचित गारठा जाणवत असला तरी दुपारी उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. डिसेंबर महिना निम्म्यावर संपत आला तरी म्हणावी तशी थंडी जाणवत नसल्याने गुलाबी थंडीची प्रतिक्षाच करावी लागत आहे. मंगळवारी पहाटे पासून सकाळी 8 वाजेपर्यंत हवेत गारठा जाणवत होता. सुर्य जसजसा वर येईल तसा उष्मा जाणवू लागला. सकाळी 10 वाजल्यानंतर उन्हाचा कडाका वाढू लागला. दुपारनंतर उन्हाचा चटका वाढतच राहीला. पुढील आठ दिवस तापमान चढेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त वारे पश्चिमेकडे वळल्याने ढगाळ वातावरण झाले होते. त्याचबरोबर चार दिवसापुर्वी जिल्ह्यात काही भागात पाऊस पडला होता. थंडीच्या महिन्यातही नागरिकांना पावसाचा सामना करावा लागला. फेंगल वादळामुळे हवामानात बदल झाल्यामुळे थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाली आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीत वाढ शक्य
यंदा परतीच्या पावसाचा उशिरा प्रवास, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, फेंगल चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस, बाष्पयुक्त वारे यामुळे ढगाळ वातावरण झाले. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीतवाऱ्यांवरही परिणाम झाला. त्यामुळे थंडी गायब झाली. पुढील आठवढ्यातही तापमानात वाढच राहणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीला पुन्हा सुरुवात होईल असा अंदाज आहे.
डॉ. युवराज मोटे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक