सीबीटीमधील अस्वच्छता जैसे थे : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक (सीबीटी) हे सर्वांसाठी प्रवासासाठीचे मुख्य केंद्रस्थान आहे.मात्र बसस्थानकात स्वच्छतेचा बोजवारा उडत असून बसस्थानकात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतेसाठी अपुरे कर्मचारी असून ते बसस्थानकातील कचऱ्याची उचल करून सदर कचरा बसस्थानकात निर्माण करण्यात आलेल्या शेडमध्ये ठेवण्यात येतो. मात्र हा शेडही कचरा बांधून ठेवलेल्या बॅग्सनी ओव्हरफ्लो झाल्याने कुत्री हा कचरा बसस्थानकात पसरवत आहेत. यामुळे बसस्थानकात ठिकठिकाणी कचरा दिसून येत आहे. याकडे परिवहन अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
मध्यवर्ती बसस्थानक हे प्रवासासाठीचे मुख्य केंद्र आहे. बसस्थानकातून दररोज हजारो प्रवाशी विविध ठिकाणी प्रवास करत असतात. स्मार्टसिटी अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून मध्यवर्ती बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. बसस्थानकात सर्व सुविधा पुरविल्या असून प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र बसस्थानकातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून परिहवन अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून ते बसस्थानक परिसरात विविध ठिकाणी कचरा, पान व गुटखा खाऊन थूंकल्याचे चित्र दिसून येते. स्वच्छतेसाठी तैनात असणारे कर्मचारी कचऱ्याची उचल करून तो कचरा मोठ्या प्लॅस्टिक पिशवीत भरून पत्र्याच्या शेडमध्ये ठेवतात. मात्र सदर शेडही कचऱ्याच्या पिशव्यांनी पूर्णपणे भरले असून काही पिशव्या बाहेरच्या ठिकाणी ठेवल्या आहेत. मात्र कुत्री या पिशव्या फाडत असल्याने काचरा बसस्थानकात पसरत आहे. यासाठी परिवहन अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.