दिल्लीकरांसाठी सर्वात ‘स्वच्छ’ महिना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीकरांनी यंदा गेल्या दशकभरातील सर्वात स्वच्छ जुलै महिन्याचा अनुभव घेतला आहे. सध्या असलेल्या जुलै महिन्यात दिल्लीतील वायुप्रदूषण गेल्या दशकातील सर्वात कमी पातळीवर असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत या महिन्यात दिल्लीचा प्रदूषण निर्देशांक सरासरी समाधानकारक पातळीवर राहिला आहे. शनिवारी सकाळी 9 वाजता वायूप्रदूषण निर्देशांक 91 इतका होता.
सर्वसाधारणपणे वर्षभर दिल्लीत वायूप्रदूषण अत्यंत वाईट, वाईट किंवा धोकादायक अशा पातळ्यांवर राहते. मात्र्हृ हा जुलै महिना याला अपवाद ठरला आहे. या महिन्यात अनेक दिवस दिल्लीचा प्रदूषण निर्देशांक ‘समाधानकारक’ या पातळीवर राहिल्याचे दिसून आले आहे. दिल्लीच्या हवेत सुधारणा होत आहे, याचे संकेत यातून मिळत आहेत. तथापि, आत्ताच मोठा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. अशी स्थिती पुढचे दोन ते तीन महिने राहिल्यास प्रगती झाली, असे म्हणता येईल, असे केंद्रीय हवामान विभागाचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने आणि दिल्ली राज्य सरकारने गेल्या तीन महिन्यांमध्ये वायूप्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपायांचे क्रियान्वयन करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, या उपाययोजनांचे शाश्वत परिणाम दिसून येण्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागणार आहेत. विशेषत: हिंवाळ्यात प्रदूषण योग्य पातळीवर राहिले, तरच सुधारणा झाली असे म्हणता येणार आहे. तथापि, जुलै महिना हा ‘उत्साहवर्धक’ ठरत आहे, असे मानले जात आहे.