महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोलिसांची ‘क्लीन चीट’ ठरली वादग्रस्त

04:09 PM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्व विरोधकांनी उठविली टीकेची झोड : माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केला निषेध,पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त

Advertisement

पणजी : गेले पंधरा दिवस गोव्यात ‘सरकारी नोकरीसाठी पैसे’ हा घोटाळा गाजत असून रोज नवनवीन तक्रारी येत असून रोज अनेकांना अटकही होत आहे. महिलांचाच अधिक भरणा असलेल्या या घोटाळ्याने गोव्याची उरलीसुरली लाज काढली आहे. या महिला गेले कित्येक दिवस जणू ‘पोलिस पॅकेज टूर’वर असल्याचे भासते. त्यांची एका पोलिसस्थानकाच्या कोठडीतून दुसऱ्या स्थानकाच्या कोठडीत रवानगी होत आहे. एकापेक्षा एक आश्चर्यकारक आणि तेवढ्याच प्रमाणात संतापजनक प्रकरणांचा पर्दाफाश होत आहे. दुसऱ्या बाजूने पोलिसांकडून कोणत्याही प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही, कोणावरही आरोपपत्रही दाखल झालेले नाही, तरीही पोलिसातील बड्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावा करुन राजकारण्यांना ‘क्लीन चीट’ देण्याचा प्रयत्न  केल्याने त्याचे तीव्र पडसाद काल रविवारी राज्यभरात उमटले. मुख्य म्हणजे खुद्द भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. काँग्रेस तसेच गोवा फॉरवर्ड पक्षानेही रविवारी पोलिसांवर टीकेची झोड उठविल्याने संपूर्ण राज्यात सध्या या घोटाळ्यावरुन एकच खळबळ माजलेली आहे.

Advertisement

नोकरी घोटाळ्यात पोलिस ‘क्लीन चीट’ कशी देतात? माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा खडा सवाल

पैसे घेऊन लोकांना लुबाडण्याच्या नोकरी घोटाळ्यात पोलिसांनी कोणाला ‘क्लीन चीट’ देऊ नये आणि त्यांनी त्या पातळीपर्यंत जाऊ नये. त्यांचे काम प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे असून कोणालाही ‘क्लीन चीट’ देण्याचे नव्हे, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सुनावले आहे. या घोटाळ्यात राजकीय कनेक्शन नाही, असा दावा पोलिसांनी केल्याबद्दल पार्सेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुळापर्यंत जाण्याची गरज असून पैसे देऊन ज्यांनी नोकऱ्या मिळवल्या त्यांचीही नावे शोधून काढावीत, असेही पार्सेकर यांनी सुचवले आहे. पार्सेकरांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना पुढे सांगितले की, या घोटाळ्यात ज्या महिलांना अटक झाली आहे त्यांनी काहीजणांची नोकरीची कामे पैसे घेऊन केलेली आहेत. त्यात त्यांना यश आल्यामुळेच त्यांची नावे आज लोकांच्या समोर आली आहेत. त्यांनी नोकरी देण्याची विश्वासार्हता तयार केली म्हणूनच त्यांनी लोकांकडे रकमेची मागणी केली आणि लोकांनी नोकरीच्या आशेने लाखांची रक्कम दिली. सरकारकडे किंवा मंत्र्यांकडे जवळीक असल्याशिवाय हे प्रकार होणे शक्य नाही. हा गुन्हा अक्षम्य असून फोंडा तालुक्यातच हा प्रकार जास्त फोफावला आहे. तेथे चार मंत्री आहेत याकडेही पार्सेकरांनी लक्ष वेधले. या प्रकरणातून अनेकांवर अन्याय झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

न्यायालयीन चौकशीच हवी,विजय सरदेसाईंकडून पुनरुच्चार,पोलिसांच्या ‘क्लीन चीट’चा निषेध

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी लोकांचा रोष आणि निष्पक्ष तपास करण्याच्या गोवा पोलिसांच्या क्षमतेवर विश्वास नसल्याची कारणे देत सध्याच्या नोकरी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी या मागणीचा पुनऊच्चार केला आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, इतर प्रमुख नेते आणि लोकांना या घोटाळ्यात राजकारणी गुंतले आहेत, असे वाटते याकडे लक्ष वेधून सरदेसाई यांनी पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या ‘क्लीन चिट’चा निषेध केला आहे. या घोटाळ्याचे खरे बळी हे गोव्यातील गुणवंत तऊण उमेदवार आहेत, ज्यांनी कठोर परिश्रम घेऊन तयारी केली आणि उच्च गुण मिळवले. परंतु त्यांना नोकरी नाकारण्यात आली, कारण लाच दिलेल्यांना पदे विकली गेली. भ्रष्टाचाराचे फिरत असलेले पुरावे पाहता सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया तत्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या अध्यक्षांनी केली आहे. या पुराव्यांत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने मंत्र्याला नोकरीसाठी पैसे दिल्याचे कबूल केल्याच्या रेकॉर्डिंगचा समावेश आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

ज्यांनी लाच दिली ते पीडित नाहीत, तर ते तितकेच दोषी आहेत. हा घोटाळा ‘एचआर’ एजंटांनी नोकरी शोधणाऱ्यांची फसवणूक करण्याबद्दल नाही, तर लाच आणि राजकीय हेराफेरीबद्दल आहे. या घोटाळ्यात भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी सहभागी असून गोव्यातील प्रामाणिक तऊणांना बाजूला करण्यात आले आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई यांनी या घोटाळ्यामुळे झालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नालस्तीवरही प्रकाश टाकला आहे. लोक आम्हाला हसत आहेत. भाजपचे मंत्री आणि आमदारांनाही या सरकारच्या कारभाराची लाज वाटत आहे. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी लाज वाटत असल्याने आणि पेचात पडण्याच्या शक्यतेने मंत्री लग्न सोहळे टाळत असल्याची कबुली दिली आहे. भाजप आतून फुटत असल्याचा हा पुरावा आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.  गोवा फॉरवर्ड पार्टी गोव्यातील कष्टाळू तऊणांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि जोपर्यंत निष्पक्ष न्यायालयीन चौकशी होत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया थांबवावी अशी मागणी करते. सरकारकडे लपविण्यासारखे काही नसेल, तर मग अशा चौकशीला परवानगी द्यावी, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले आहे.

पोलिसांकडून भाजपची प्रवक्तेगिरी,काँग्रेसचे सुनील कवठणकर यांचा टोला

लोकांना लुबाडून केलेल्या नोकरभरती घोटाळ्याबाबत पोलिस खात्याने घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे भाजपची प्रवक्तेगिरी असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केली आहे. या प्रकरणात राजकीय कनेक्शन नसल्याचा पोलिसांनी केलेला दावा पूर्णपणे चुकीचा असून तसा दावा करणारे हे बडे पोलिस अधिकारी भाजपचे प्रवक्तेच शोभतात, असा टोला कवठणकर यांनी मारला आहे. त्यांनी फक्त भाजपचे उपरणे घातले नव्हते एवढाच काय तो फरक होता, असेही कवठणकर म्हणाले. भाजपने या एकाच प्रकरणावर तीन पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्यात भाजपचा काही संबंध नाही, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोलिसांची पत्रकार परिषद झाली ती म्हणजे कळसच आहे. चौकशी पूर्ण झालेली नाही. कोणावरही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नसताना पोलिस खाते राजकारण्यांना क्लीन चीट देतात हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे पोलिसांचे तपासकाम कोणत्या मार्गाने जात आहे ते जनतेला समजून चुकले आहे. म्हणूनच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कवठणकर यांनी पुन्हा केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article