शालेय सहलींनी शहर फुलले
कोल्हापूर :
राज्यभरातून शालेय सहली कोल्हापुरात येत आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई आणि जोतिबा दर्शनानंतर कोल्हापूरातील न्यू पॅलेस, रंकाळा आणि पन्हाळ्यासह इतर ठिकाणी शालेय विद्यार्थी भेट देवून पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. कोल्हापुरात आल्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेवून प्रसादासह महाव्दार रोडवर खरेदीही मोठया प्रमाणात केली जात आहे. राज्याच्या विविध जिह्यातून कोल्हापुरात येत असलेल्या सहलींमुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गर्दीचा माहोल दिसत असून शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही काळ वाहतुकीची कोंडी होत आहे.
कोल्हापूरात शालेय सहली मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने गर्दीत भर पडत आहे. अंबाबाईचे दर्शन झाल्यानंतर रंकाळा, न्यू पॅलेस, टाऊन हॉल म्युझियम, पन्हाळा, जोतिबा आदी ठिकाणाला शालेय विद्यार्थी भेट देतात. त्यामुळे पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळे फुलून गेली आहेत. सहलीतील काही विद्यार्थी व शिक्षकांनी टाऊन हॉल व न्यू पॅलेस परिसरातील झाडाच्या सावलीला पंगती पाडून जेवणाचा अस्वाद घेत आहेत. तर काही सहलीतील शाळकरी मुले कोल्हापुरातील प्रसिद्ध असलेला तांबडा पांढऱ्या रस्सा आणि मिसळीवर ताव मारताना दिसत आहेत. सहलींमुळे कोल्हापूर शहरातील हॉटेल, यात्रीनिवासचे बुकींग फुल झाले आहे. महाव्दार रोड, जोतिबा रोडवर विद्यार्थ्यांकडून मनसोक्त खरेदी केल जात आहे. दसरा चौकात बस पार्किंग करून अंबाबाई मंदिराकडे एका रांगेत जाणारे विद्यार्थी पाहून शालेय शिस्तीचे दर्शन होते. सहलींच्या एस. टी. बसनी शहरातील पार्किंगही फुल झाली आहेत.
सहलींसाठी एस. टी. बसने प्रवास बंधनकारक
शालेय सहलींसाठी शिक्षण विभागातून परवानगी काढने बंधनकारक असल्याने सर्व सहली परवानगी काढून आल्या आहेत. तसेच सहलीला जाताना खासगी वाहनाला परवानगी नसल्याने एस. टी. बसनेच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाकडूनही विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी प्राधान्याने बस दिल्या जात आहेत. सहलींसाठी 15 जानेवारीपर्यंतच परवानगी असल्याने सहलींच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.
विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
सहलीवर आलेले विद्यार्थी व शिक्षकांकडून अंबाबाईचा प्रसाद, भडंग, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पलसह कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्येही आनंदाचे वातावरण असल्याचे चित्र आहे.