विशाळगडावर पर्यटकांना सशर्त परवानगी
कोल्हापूर :
विशाळगडावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावरुन जुलै महिन्यात झालेल्या हिंसक घटनेमुळे विशाळगड 15 जुलैपासून पर्यटकांना बंद करण्यात आला होता. यामुळे गेली पाच महिने विशाळगडावर बंदी आदेश असल्यामुळे पर्यटन बंद होते. पाच महिन्यानंतर जिल्हा प्रशासनाने नियम व अटी घालून 31 जानेवारी 2025 पर्यंत विशाळगडावर पर्यटकांना दिली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पर्यटकांना गडावर जाता येणार आहे. शाहूवाडीचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी हा आदेश काढला आहे
विशाळगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून चर्चेत आहे.विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी काही संघटना आक्रमक झाल्या होत्या.मुख्य गडावर आणि गडाच्या पायथ्याशी मोठया प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे ते काढावे अशी होती. दरम्यान हे प्रकरण न्यायालयात गेले आणि काही मिळकतींना स्थगिती मिळाली होती.
मात्र जुलै 2024 मध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या प्रश्नावरुन आक्रमक झाले होते. प्रशासनाकडून कारवाई झाली नाही तर विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहीम राबवण्याचा इशारा त्यांनी दिला होता.मात्र त्यावेळी प्रशासनाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने माजी खासदार संभाजीराजे यांनी 14 जुलै 2024 रोजी विशाळगडावर गेले.त्याचदिवशी संभाजीराजे छत्रपती गडावर पोहोचण्यापूर्वी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या तरुणांनी गडावर पहाटेच तोडफोड केली होती.प्रापंचित साहित्यासह वाहनांची मोठया प्रमाणात नासधूस केली होती.दुपारी संभाजीराजे छत्रपती गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतरही जमावाकडून तोडफोड सुरुच होती.
या घटनेनंतर राज्यात विशाळगड दंगलीचे पडसाद उमटले.कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे जिल्हा प्रशासनाने विशाळगडावर संचारबंदी लागू करुन पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. यामुळे गेली पाच महिने विशाळगड पर्यटकांसाठी बंद होता. गजापूरजवळ पोलीसांची चौकी उभारण्यात आली होती.याठिकाणी चोवीस तास बंदोबस्तासाठी पोलीस होते. या बंदीमुळे पर्यटनाच्या रोजगारावर अवलंबून असलेल्या स्थानिक रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले तर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक दिनादिवशी झालेल्या बैठकीत विशाळगडावरील बंदी उठवण्याची मागणी केली होती. तसेच काही संघटनांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
पाच महिन्यानंतर पर्यटकांना प्रवेश
पाच महिन्यानंतर प्रशासनाने नियम व अटी घालून विशाळगडावर पर्यटकांना परवानगी दिली आहे.शाहूवाडीचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी हा आदेश काढला आहे. 31 जानेवारी पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेतच गडावर प्रवेश असणार आहे.सायंकाळी पाच नंतर गडावर थांबता येणार नाही. तसेच तपासणी करुन पर्यटकांना गडावर सोडण्यात येणार आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशाळगडावर कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत.