‘कोळ्यां’चे नगर...
आपल्या अंगभूत कौशल्याने कोणत्याही आडोशाच्या स्थानी जाळे निर्माण करणारा कोळी हा कीटक आपल्याला माहीत आहे. या कोळ्यांचे मोठे नगरच असावे, असे एक महाकाय जाळे रुमानिया या देशाच्या संशोधकांनी शोधून काढले आहे. या नव्या शोधाची माहिती ‘सबटेरियन बॉयॉलॉजी’ नामक एका शास्त्रविषयक प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. या जाळ्याची माहिती आणि छायाचित्रे सोशल मिडियावरही प्रसिद्ध झाली आहेत. कोळ्याचे जाळे इतके भक्कम आणि प्रचंड असू शकते, यावर कोणाचाही विश्वास बसणे शक्य नाही. पण हे सत्य आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे जाळे एका कोळ्याने बनविलेले नाही. सहस्रावधी कोळ्यांचा त्याच्या निर्मितीत सहभाग होता. या जाळ्यात एकावेळी 1 लाख 10 हजारांहून अधिक कोळी वास्तव्य करीत होते. हे जणू या कोळ्यांचे एक मोठे नगरच होते. इतक्या मोठ्या आकाराचे जाळे सापडण्याची ही प्रथमच वेळ आहे. रुमानिया देशातील एका गंधकयुक्त गुहेत हे जाळे संशोधकांना काही दिवसांपूर्वी आढळले आहे. प्रथम हे जाळे आहे यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. तथापि, नंतर अधिक निरीक्षण करता, हे कोळ्याचे जाळे असल्याचे स्पष्ट झाले. विशेष बाब ही, की या जाळ्यात एकाचवेळी दोन प्रतिस्तर्धी कोळ्यांच्या प्रजातींचे वास्तव्य होते. या कोळ्यांचा प्रजाती एकमेकींपासून भिन्न असल्या तरी या जाळ्यात गुण्यागोविंदाने नांदत असत. हे एकच जाळेही नाही. या जाळ्यात असंख्य छोटी जाळी आहेत. या अनेक जाळ्यांचे धागे एकमेकांमध्ये मिसळून हे जाळे चांगलेच भक्कम झाले आहे. या जाळ्याला आता संशोधकांनी ‘कोळ्यांचे नगर’ किंवा ‘स्पायडर सिटी’ असे सार्थ नाम दिले आहे. या जाळ्याच्या धाग्यांचा अभ्यास आता केला जात आहे. असे भक्कम धागे कृत्रिमरित्या निर्माण करता येतील काय, असाही विचार केला जात आहे. हे जाळे महान आश्चर्य आहे, अशी भावना आहे.