‘लिटिल क्योटो’ नावाने प्रसिद्ध शहर
राजा-राणीप्रमाणे असते लोकांचे राहणीमान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशीला क्योटोच्या धर्तीवर विकसित करण्याचे आश्वासन दिले होते, कारण क्योटो जपानमधील अत्यंत सुंदर शहर आहे, परंतु एक शहर लिटिल क्योटो म्हणून ओळखले जाते. ओजू नावाचे हे शहर जपानच्या एहिमे प्रांतात असून तेथे एकापेक्षा एक सुंदर असे महाल आहेत. लोक तेथे राजा-राणीप्रमाणे राहणे पसंत करतात. त्यांच्याप्रमाणेच लाइफस्टाइल असते.
येथे लाकडाने तयार करण्यात आलेला एक सुंदर महाल असून त्याला ओजू कॅसल या नावाने ओळखले जाते. येथे पर्यटक वास्तव्य करतात. या चारमजली महालाचा एका रात्रीसाठी मालक होता येते. राजा-राणीप्रमाणे येथे वास्तव्य करता येते. याचबरोबर राजघराण्याच्या सदस्याप्रमाणे भोजनाचा आनंद घेता येतो. महालात वास्तव्य करणाऱ्या अतिथींना ओजूचा अखेरचा शासक काटो डेम्योसप्रमाणे जगण्याची संधी मिळेल.
ओजू कॅसल जपानमध्ये असलेल्या मोजक्या लाकडी महालांपैकी एक आहे. येथे 1617 च्या काळात राजा ज्याप्रकारे राहत होता, त्याचप्रकारे सर्वकाही उपलब्ध होणार आहे. ओजू स्वत:ची सुंदर हिजी नदी, ऐतिहासिक वास्तुकला आणि सुंदर महालासाठी ओळखले जाते. 1888 मध्ये मूळ ओजू महाल उदध्वस्त झाला होता. यानंतर 1990 च्या दशकात तो पुन्हा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्राँक्रिटऐवजी लाकडाचा वापर करत हा महाल निर्माण करण्यात आला आहे. आता येथे अतिथींना वास्तव्याची संधी दिली जाते. एका रात्रीसाठी केवळ 6 जणांनाच या महालात वास्तव्य करता येते.
महालाचे दरवाजे संध्याकाळी 5 वाजता बंद होतात. मग तेथे राजेशाहीच्या थाटासोबत राहण्याची संधी मिळते. एका अतिथीच्या एका दिवसाच्या वास्तव्यासठी सुमारे 8 लाख रुपये खर्च येतो. येथे अतिथींसाठी एक स्वतंत्र लक्झरी बाथरुम तयार करण्यात आला आहे. येथे पाहुण्यांचे स्वागत शंख किंवा तुतारीच्या ध्वनीद्वारे केला जातो. फडकणाऱ्या झेंड्यांसोबत स्क्वाड्रन संबंधितांना महालात घेऊन जाते. अतिथी येथे पारंपरिक किमोनो आणि मध्ययुगीन योद्धा पोशाखापैकी काहीही परिधान करण्यासाठी निवडू शकतात. यानंतर त्यांच्यासमोर एक पारंपरिक नृत्य सादर केले जाते, ज्याला कगुरा म्हटले जाते.
डिनर महालाच्या मधोमध निर्मित बुर्जच्या खाली वाढण्यात येते. येथून संबंधितांना चंद्राचे सुंदर दृश्य दिसून येते. त्यांच्यासमोर कवितांचे वाचन होते. मधूर संगीत कानावर पडत असते. नाश्ता करण्यासाठी अतिथींना गारयू सॅन्सो येथे नेण्यात येते. हे एका ऐतिहासिक टेकडीवरील महाल असून तेथून हिजी नदीचे सुंदर दृश्य दिसते.
याचबरोबर शहरात आणखी अनेक सुंदर महाल आहेत, तेथेही लोकांना वास्तव्य करता येते. काहींचे वास्तव्यभाडे 13 हजार रुपयांपासून सुरु होते. ओजू एहिमे प्रांताची राजधानी मात्सुयामा आणि त्याच्या विमानतळापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. मात्सुयामापासून बस किंवा रेल्वेद्वारे देखील ओजू येथे पोहोचता येते.