पर्यटक, शाळेच्या सहलींनी गजबजले शहर
कोल्हापूर :
नाताळची सुट्टी, शाळेच्या सहली व नववर्षाच्या स्वागतासाठी शहरासह जिल्हा पर्यटकांनी बहरले आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी सकाळापासूनच गर्दी होत असुन पर्यटकांचा ओघ वाढत असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही काळ वाहतुकीची कोंडी होत आहे. बुधवारी दिवसभर धार्मिकस्थळासह विविध पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली आहेत.
राज्यासह परराज्यातून शाळेच्या सहली मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने पर्यटकांच्या गर्दीत भर पडत आहे. अंबाबाई दर्शनानंतर दिवसभर रंकाळा, न्यू पॅलेस, जोतिबा, पन्हाळा आदी ठिकाणची पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. नव वर्षाच्या स्वागतासाठी पुढील दोन दिवसात गर्दी आणखी वाढणार असुन हॉटेल, लॉजिंग, यात्री निवासांचे आतापासूनच बुकींग केले जात आहे. नाताळ निमित्त आलेल्या पर्यटकांची संख्या वाढल्याने बुधवारी अनेक हॉटेल्सच्या बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागल्याचे दिसत होते.
सुट्टीचा बेत आखून पर्यटनासाठी सहपरिवार सदस्य बाहेर पडत आहेत. त्यामुळे एसटी, रेल्वे, खासगी वाहतूकीची वाहणे, खासगी आराम बसेसही फुल्ल होत असल्याचे पाहायला मिळाले.
येत्या शनिवारी, रविवारी आलेली सलग सुट्टीमुळे नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी वाढणार असल्याने शहर आणखी बहरणार आहे. अंबाबाईचे दर्शन झाल्यानंतर खरेदीसाठी शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, खासबाग, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, चप्पल लाईन, पापाची तिकटी, आदी परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटक मोठ्या संख्येने एकाच वेळी शहरात दाखल होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. शहरातील प्रमुख मार्गावर वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीची शिस्त लावताना वाहतुक पोलिसांची दमछाक होत आहे.
टाऊन हॉल संग्रहालय, न्यू पॅलेस येथील छत्रपती म्युझियम पाहण्यासाठी सहलीसाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी रंकाळा व न्यू पॅलेस परिसरातील रम्य वातवरणात झाडाच्या सावलीला पंगती मांडत भोजनाचा आस्वाद घेत होती. आगामी काळात होणारी गर्दी लक्षात घेता एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांसाठी विशेष जादा 12 गाड्यांची सोय केली जाणार आहे.
रंकाळा हाऊसफुल
शहरात दाखल झालेले भाविक दिवसभरच्या भटकंतीनंतर ऐतिहासिक रंकाळा तलावाला आवर्जून भेट देत आहेत. रंकाळा तलावावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत असल्याने रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी गर्दी पहायला मिळत आहे. सायंकाळी सुर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी रंकाळा तलाव हाऊसफुल होत आहे.