For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहराचा विस्तार वाढला; अग्निशमन केंद्र मात्र एकच

10:46 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
शहराचा विस्तार वाढला  अग्निशमन केंद्र मात्र एकच
Advertisement

बेळगाव शहर-तालुक्यात चार अग्निशमन केंद्रांची आवश्यकता

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरासह तालुक्याची व्याप्ती झपाट्याने वाढत असतानाच बेळगावमध्ये केवळ एकच अग्निशमन केंद्र आहे. उद्यमबाग, मच्छे, नावगे, काकती, होनगा, ऑटोनगर येथील औद्योगिक वसाहती पाहता बेळगाव शहर व तालुक्यात एकूण चार अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना केवळ एकच केंद्र असल्याने मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोवावेस येथे 1987 मध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले. त्याकाळी शहर मर्यादित होते.  तसेच आग लागण्याच्या घटनाही कमी होत्या. परंतु मागील 38 वर्षांत एकही नवीन अग्निशमन केंद्र सुरु झाले नाही.

शहरात बाजारपेठ तसेच रहिवासी वसाहती वाढत गेल्या. त्यामुळे आगीच्या तसेच रेस्क्यू करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. दरवर्षी शंभरहून अधिक आग लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे त्या मानानेच अग्निशमन यंत्रणा सज्ज असणे गरजेचे आहे. बेळगावमध्ये सुवर्णसौध बांधण्यात आली. याठिकाणी अधिवेशन भरविले जाते. परंतु अद्याप अग्निशमन केंद्र निर्माण करण्यात आलेले नाही. राज्य सरकारने अग्निशमन केंद्राला मंजुरी दिली असली तरी अजून हे केंद्र तयार झालेले नाही. त्यामुळे शहर आणि तालुक्याचा विचार करता प्रत्येक दिशेला एखादे तरी अग्निशमन केंद्र असणे गरजेचे झाले आहे.

Advertisement

नवीन अग्निशमन केंद्राचा प्रस्ताव बारगळला

सध्याचे अग्निशमन केंद्र हे शहराच्या दक्षिण भागात आहे. परंतु शहराच्या उत्तर भागात कोणतीही आग लागली तर अर्धा ते पाऊणतास प्रवास करून वाहन पोहचेपर्यंत आगीमुळे मोठे नुकसान झालेले असते. त्यामुळे शहराच्या उत्तर भागात अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव अग्निशमन विभागाने महापालिकेकडे पाठविला. परंतु अद्याप जागा उपलब्ध झाली नसल्याने हा प्रस्ताव बारगळला.

Advertisement
Tags :

.