‘त्या’ मातेची मुले वर्षभरानंतर परतली
ऑस्ट्रेलिया सरकारशी वादानंतर नविलतीर्थमध्ये केली होती आत्महत्या
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या वर्षी सौंदत्ती तालुक्यातील नविलतीर्थ डॅमजवळ आत्महत्या केलेल्या ऑस्ट्रेलिया येथील प्रियदर्शिनी पाटील यांची मुले तब्बल एक वर्षानंतर भारतात परतली आहेत. केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रयत्नांमुळे ही मुले धारवाड येथील आजोळी पोहोचली आहेत.
ऑस्ट्रेलियामधील चाईल्ड केअर प्रोटेक्शन एजन्सी डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी जस्टीसच्या ताब्यातून या मुलांना वडिलांकडे सोपविण्यात आले आहे. धारवाड येथील प्रा. एस. एस. देसाई यांची मुलगी प्रियदर्शिनी पाटील (वय 44) या ऑस्ट्रेलियात रहात होत्या. गेल्या वर्षी 20 ऑगस्ट रोजी त्यांनी नविलतीर्थजवळ आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यांचा मृतदेहही आढळून आला होता. त्यांनी आपले मृत्युपत्र, विमानाचे तिकीट आदींचा कुटुंबीयांना कुरियर पाठवला होता. सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली होती. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर त्या माहेरी न जाता नविलतीर्थजवळ आत्महत्या केली होती.
मुलांचा ताबा घेण्यावरून प्रियदर्शिनी व ऑस्ट्रेलिया सरकार यांच्यात कायदेशीर लढाई सुरू होती. त्यांना यामध्ये यश आले नाही. त्यामुळेच बेळगाव जिल्ह्यात येऊन त्यांनी आत्महत्या केली होती. आई मुलांचा नीट सांभाळ करत नाही, असा ठपका ठेवत सरकारने या मुलांना आपल्या ताब्यात घेतले होते.
केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रयत्नामुळे प्रियदर्शिनी यांचा मुलगा अमर्त्य व मुलगी अपराजिता सिडनीहून आपले वडील लिंगराज पाटील यांच्यासमवेत धारवाडला आले आहेत. आजोबांना भेटून ते पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत, अशी माहिती मिळाली असून कुटुंबीयांनी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत.