Kolhapur News : पेठवडगावमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे काढल्याने खळबळ; स्ट्रॉंग रूमसमोर कार्यकर्त्यांचा ठिय्या
पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीत तणाव
पेठवडगाव : पेठवडगाव नगरपरिषद निवडणूक स्ट्राँग रूम परिसरात खाजगी घरांच्या वर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रशासनाने हटवल्याने यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम समोर आंदोलन केले. आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. अखेर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधींना 24 तासात स्ट्रॉंग रूम मध्ये पाहण्यासाठी हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर तणाव निवळला.
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या नगर परिषदेच्या निवडणुकीतील मत पेट्या साठी शिवाजी चौक परिसरातील मराठा मंडळाची इमारत स्ट्रॉंग रूम म्हणून वापरण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने स्ट्रॉंग रूमच्या आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत पण बाहेर स्क्रीन लावलेली नाही. त्यामुळे स्ट्रॉंग रूम परिसरातील दोन-तीन घरांच्या वर दोन दिवसापूर्वी खाजगी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे होताच. निवडणूक आयोगाने हे कॅमेरे काढण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. आज दुपारी चारच्या दरम्यान या कर्मचाऱ्यांनी संबंधित घरावरील खाजगी कॅमेरे पोलीस बंदोबस्तात काढून घेतले. याची माहिती मिळताच यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या स्ट्रॉंग रूम परिसरात ठिय्या मारला.
यावेळी कार्यकर्ते आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्यात वादावादी झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी खाजगी घरावरील कॅमेरे काढणे म्हणजे हे आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार असून ही कारवाई चुकीची आणि संशयास्पद आहे. स्ट्रॉंग रूमच्या पारदर्शकतेबाबत संशय व्यक्त होत असून स्ट्राँग रूमच्या बाहेर स्क्रीन लावावी अशी मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी खाजगी घरांच्यावर नुकताच सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रकार असल्याने वरिष्ठांनी हे कॅमेरे काढण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधींना स्ट्रॉंग रूम मध्ये पाहणी करण्याचा 24 तास अधिकार आहे त्यास आम्ही हरकत घेत नाही असे सांगितल्याने वातावरण निवळले.
तर उमेदवार संदीप पाटील यांनी स्ट्रॉंग रूम मध्ये पाहणी करण्यासाठी रूम मध्ये पाहणी करण्यासाठी कोणतीही लेखी अथवा तोंडी सूचना निवडणूक आयोगाकडून मिळालेली नाही. त्यांच्या कारभाराबाबत आम्हाला संशय व्यक्त होत आहे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर त्यांनी स्क्रीन लावावी अशी मागणी केली.