रालोआचे मुख्यमंत्री नितीशकुमारच !
चिराग पासवान यांच्याकडून नि:संदिग्ध वक्तव्य
► वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा एकदा विजयी झाल्यास नितीश कुमार हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे सुस्पष्ट वक्तव्य लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी केले आहे. आम्ही ही विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच लढत आहोत. आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तेच आहेत. लोकजनशक्ती (रामविलास पासवान) पक्षाचे निवडून आलेले सर्व आमदार त्यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देतील. यासंबंधी स्थिती स्पष्ट आहे, असे त्यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलत असताना स्पष्ट केले आहे.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत पासवान यांच्या पक्षाने 142 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार दिले होते. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची संख्यात्मक हानी झाली होती. पासवान यांच्या उमेदवारांनी लक्षणीय मते घेतल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अनेक जागा पडल्या, अशी टीका त्यावेळी करण्यात आली होती. तथापि, यावेळी चिराग पासवान राष्ट्रीय लोकशाही आघाडीतच आहेत. आघाडीच्या जागावाटपाप्रमाणे त्यांच्या पक्षाचे उमेदवार 29 स्थानांवर मैदानात आहेत. मागच्या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढलो होतो. तरीही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय झाला होता. आता आम्ही याच आघाडीसमवेत आहोत. त्यामुळे आघाडीचा विजय अधिकच सुनिश्चित झाला आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे प्रतिपादन चिराग पासवान यांनी केले आहे.
‘महागठबंधन’वर हल्लाबोल
यावेळी चिराग पासवान यांनी महागठबंधनवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारने संसदेच्या माध्यमातून संमत केलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयानेही वैध ठरविलेल्या नव्या वक्फ सुधारणा कायद्यासंबंधी महागठबंधनचे नेते तेजस्वी यादव मुस्लीमांची दिशाभूल करीत आहेत. हा कायदा यादव रद्द करु शकत नाहीत कारण तो केंद्रीय कायदा आहे. तो बिहारलाही लागू आहे. त्यामुळे तेजस्वी यादव या संबंधी जी आश्वासने मुस्लीमांना देत आहेत, ती खोटी आहेत. पराभव होण्याच्या भीतीपोटी ती दिली जात आहेत, असा घणाघात पासवान यांनी केला. मी यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही. 2030 च्या विधानसभा निवडणुकीत मी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकेन, असेही वक्तव्य चिराग पासवान यांनी केले.
नितीश कुमार पासवान यांच्या घरी
बिहारमध्ये सध्या छटपूजेचे पर्व साजरे केले जात आहे. या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी चिराग पासवान यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी यावेळी बिहारची विधानसभा निवडणूक, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रचार आणि इतर विषयांवर चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील एकोप्याचे दर्शन घडले असून याचा या आघाडीला लाभ होणार आहे, असे तज्ञांचे मत आहे. बिहारमध्ये 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.