शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना उशिरा सुचले ज्ञान
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा टोला
बेंगळूर : ऊस आणि मका शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उशिरा ज्ञान सूचल्याचे दिसून येत आहे, असा टोला केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री त्यांच्या कुंभकर्ण निद्रेतून थोडे उशिरा जागे झाले आहेत. इथेनॉल उत्पादनासाठी मका खरेदी करण्यास करार करावे, यासाठी त्यांनी डिस्टिलरीजना पत्र लिहिले आहेत, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. इथेनॉल उत्पादन करण्यास मका खरेदी करण्यासाठी एनसीसीएफ आणि एनएएफईडीसोबत करार करण्यास सांगितले आहे.
इतके दिवस पंतप्रधान मोदींना सर्व गोष्टींसाठी पत्रे लिहिणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता ज्ञानोदय झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता डिस्टिलरीजना पत्र लिहून इथेनॉल उत्पादनासाठी आधारभूत किमतीवर मका खरेदी करण्यासाठी एनसीसीएफ आणि नाफेडशी करार करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारला आपल्या कामाची जाणीव आता झाल्याचे दिसते. शनिवारीच आपण राज्य सरकार आपली जबाबदारी विसरल्याचे म्हटले होते. मका खरेदीबाबत केंद्र सरकारने स्पष्टपणे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे (एसओपी) पालन करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही केंद्रीय मंत्री प्रहाद जोशी यांनी केला.