For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशात सरन्यायाधीशांचाही राजीनामा

06:58 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशात सरन्यायाधीशांचाही राजीनामा
Advertisement

विद्यार्थ्यांच्या अल्टिमेटमनंतर पायउतार : देशातील तणावाची सर्वोच्च न्यायालयालाही झळ

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशात शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्यानंतर शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनीही राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला होता. तेथे आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले होते. जर न्यायाधीशांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना हसीनांप्रमाणे खुर्चीवरून खाली खेचले जाईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हसिना यांच्याशी संगनमत करत असल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला होता.

Advertisement

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्यानंतर आता सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे सुरू असलेले हिंसक आंदोलन शनिवारी सर्वोच्च न्यायालयाकडे वळले. तेथे आंदोलक विद्यार्थ्यांनी सर्व बाजूंनी न्यायालयाच्या परिसराला घेराव घालत सरन्यायाधीशांसह सर्व न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी त्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला होता, त्यानंतर सरन्यायाधीशांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान सरन्यायाधीशांनी अंतरिम सरकारला न विचारता शनिवारी संपूर्ण न्यायालयाची बैठक बोलावली. या बैठकीमुळे आंदोलकांनी तासाभरात न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केली. सरन्यायाधीशांच्या राजीनाम्यानंतर आणखी 5 न्यायाधीश आपली पदे सोडू शकतात. सर्व 6 न्यायाधीश राजीनामे देत नाहीत तोपर्यंत रस्ता सोडणार नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

प्रत्यक्षात शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विद्यार्थी आणि वकिलांसह मोठा जमाव न्यायालयाच्या आवारात जमू लागला आणि त्यांनी सरन्यायाधीशांसह अपिलीय विभागाच्या न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केली. नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारशी सल्लामसलत न करता सरन्यायाधीशांनी पूर्ण न्यायालयाची बैठक बोलावल्यानंतर निदर्शने सुरू झाली. न्यायाधीश एका षड्यंत्राचा भाग असल्यामुळे लोक संतप्त झाले असून ते राजीनाम्याची मागणी करत आहेत.

अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि हिंसाचारग्रस्त देशातून भारतात पळून गेल्यानंतर देशात अजूनही वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. हसीना पायउतार झाल्यानंतर लगेचच बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी प्रशासनाची सूत्रे हाती घेत अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. नोबेल शांतता पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने गुऊवारी शपथ घेतली आणि त्यांना निवडणुका आयोजित करण्याचे काम सोपवले आहे. युनूस यांच्या मार्गदर्शनात कारभार चालवण्यासाठी 16 सदस्यीय सल्लागार समितीची घोषणा करण्यात आली.

हिंदू संघटनांची ‘न्याया’साठी निदर्शने

अलिकडे एका महिन्याहून अधिक काळ चाललेल्या हिंसक निदर्शनांमध्ये किमान 560 लोक ठार झाले आहेत. शेख हसीना यांनी देश सोडल्यापासून बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावरील हल्ले वाढले आहेत. बांगलादेशात हिंसाचार, लूटमार आणि जाळपोळीच्या घटना वाढल्या आहेत. त्यांच्याविरोधात हिंदू जागरण मंचनेही ढाका येथे निदर्शने केली. हजारो लोकांनी शाहबाग चौकात एकत्र येत हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवला. यावेळी त्यांनी हरे कृष्ण-हरे रामाच्या घोषणाही दिल्या. हिंसाचारादरम्यान दिनाजपूरमध्ये चार हिंदू गावे जाळण्यात आली आहेत. लोक निराधार झाले असून त्यांना लपून राहावे लागत आहे. आंदोलनादरम्यान हिंदू समाजाने अल्पसंख्याक मंत्रालयाची स्थापना, अल्पसंख्याक संरक्षण आयोगाची स्थापना, अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची आणि संसदेत अल्पसंख्याकांसाठी 10 टक्के जागा ठेवण्याची मागणी केली. आंदोलकांनी हिंसाचारात बाधित झालेल्यांना भरपाई देण्याची मागणीही केली. याशिवाय मोडकळीस आलेली मंदिरे पुन्हा बांधण्याची मागणीही करण्यात आली.

माझी आई अजूनही पंतप्रधान : जॉय

शेख हसीना यांचा मुलगा जॉय यांनी आपली आई अजूनही पंतप्रधान असल्याचा दावा केला आहे. माझ्या आईने अधिकृतपणे राजीनामा दिला नाही. तिच्याकडे तेवढा वेळ नव्हता. अधिकृतपणे त्या अजूनही पंतप्रधान आहेत, असे जॉय म्हणाले. राष्ट्राला संबोधित केल्यानंतर तिला अधिकृतपणे राजीनामा द्यायचा होता, परंतु विरोधकांनी पंतप्रधान निवासस्थानाकडे कूच करण्यास सुऊवात केल्याने तिला काहीच करायला वेळ नव्हता. साहजिकच माझी आई अजूनही बांगलादेशची पंतप्रधान आहे. लष्करप्रमुख आणि विरोधी नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केली, परंतु पंतप्रधानांनी औपचारिकपणे राजीनामा न देता काळजीवाहू सरकारच्या स्थापनेला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असा दावाही त्यांनी केला.

Advertisement
Tags :

.