कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिरगावात घुमला लईराईचा जयजयकार

01:09 PM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गर्दी-धक्काबुक्की टाळण्यास आखलेली योजना यशस्वी : चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमिवर जत्रोत्सवाची शांतीत सांगता,तरीही भाविकांची पोलिसांशी बाचाबाची, झटपटही झालीच,देवस्थान, प्रशासन, पोलिसांनी बजावली योग्य भूमिका

Advertisement

डिचोली : शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवात होमकुंड मार्गक्रमणाच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी 6 मे रोजी जत्रोत्सवाच्या व कौलोत्सवाच्या अखेरच्या दिवशी देवीचा कळस मंदिरात प्रवेश करताना गर्दी होऊ नये व पुन्हा कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये, यासाठी आखण्यात आलेली योजना सफल झाली. देवीचा कळस मंदिरात प्रवेश करताना केवळ चौगुले मानकरी, सेवेकरी व वाजंत्री सभामंडपात आल्याने कोणत्याही गर्दी किंवा गोंधळाशिवाय देवीचा कळस रितसरपणे मंदिरात प्रवेश करता झाला. जत्रोत्सवाच्या रात्री होमकुंड मार्गक्रमणावेळी शिरगाव येथे घडलेल्या अनपेक्षित प्रकारातून बोध घेत देवस्थान समिती व प्रशासन यांनी पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत यासाठी मोठ्या उपाययोजना आखल्या होत्या. देवस्थान समितीने जत्रेच्या अखेरच्या दिवशी काल मंगळवारी शिरगावत दुपारनंतर बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी जारी केली होती.

Advertisement

निर्णयाची कडक अंमलबजावणी

सकाळपासूनच शिरगावात प्रवेश करणारे सर्व रस्ते पोलिसांकरवी अडविण्यात आले होते. केवळ शिरगावातील स्थानिकांनाच गावात प्रवेश दिला जात होता. त्यामुळे सकाळपासूनच शिरगावात लोकांची गर्दी कमी झाली होती. देवस्थान समितीतर्फे सर्व दुकानदारांना पाचव्या दिवशी सकाळपर्यंत सर्व दुकाने हटवण्याची सूचना करण्यात आली होती, त्याप्रमाणे सर्व दुकानदारांनी सहकार्य करीत आपली दुकाने दुपारपर्यंत हटवून सामानही नेले होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत शिरगावातील सर्व रस्ते मोकळे झाले होते.

गर्दी नसल्याने सर्वकाही सुरळीत

शिरगावात लोकांना प्रवेश बंदी असल्याने देवीच्या घरातील भेटी सुरळीत व कोणताही विलंब न होता झाल्या. कळसाला जास्त काळ एका एका घरामध्ये राहावे लागले नाही. त्यामुळे संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व घरांमधील भेटी संपवून देवीच्या कळसाने परंपरेप्रमाणे मुख्य मंदिराजवळ येत असताना रवळनाथ मंदिरात भेट दिली आणि नंतर थेट वाजत गाजत मुख्य मंदिरात प्रवेश केला.

कडक पोलिस बंदोबस्त तैनात

म्ंदिराच्या बाहेर व मुख्य द्वारावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिला व पुऊष पोलिस चोहोबाजूने कडे करून उभे होते. कोणालाही मंदिराच्या मंडपात सोडले जात नव्हते. शिरगावातील लोकांनाही मंदिराच्या सभामंडपात येण्यास मज्जाव करण्यात येत होता. केवळ देवस्थान समितीचे पदाधिकारी व चौगुले धोंडगणांनाच मंदिराच्या सभामंडपात प्रवेश दिला जात होता. ज्यावेळी देवीचा कळस सभामंडपाच्या मुख्य दाराजवळ पोहोचला त्यावेळी कळसामागे असलेल्या असंख्य धोंडगण व शिरगावातील भाविकांनीही सभामंडपामध्ये प्रवेश करण्यासाठी जोर लावला. मात्र कडक पोलिस बंदोबस्त असल्याने या लोकांना पोलिसांनी गेटच्या बाहेरच अडवून ठेवले. यावेळी पोलिस व ग्रामस्थ यांच्यात बरीच झटापट व बाचाबाचीही झाली. तरीही पोलिसांनी देवस्थान समितीच्या सूचनेनुसार सभामंडपात कोणालाही प्रवेश करू दिला नाही.

लईराई मातेचा जयजयकार

मंदिराच्या सभामंडपात दरवर्षीप्रमाणे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी देवीचा कळसही उत्साहपूर्णतेने नाचला. त्यांच्याबरोबर चौगुले मानकऱ्यांनीही ठेका धरला. मंडपाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी श्री देवी लईराई माता की जयचा गजर करीत या सोहळ्यात सहभागी झाले.

सर्वकाही सुरळीत झाले : गावकर

अखेरच्या दिवशी देवस्थान समितीच्या आदेशाप्रमाणे व आखलेल्या योजनेप्रमाणेच सर्वकाही सुरळीत पार पडले. देवी लईराईचा जत्रोत्सव दरवर्षीप्रमाणे संपन्न झाला. या जत्रोत्सवात अग्निदिव्य मार्गक्रमणावेळी झालेल्या घटनेने जरी गालबोट लागले असले तरी त्यानंतर देवस्थान समिती व प्रशासनातर्फे लोकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हाती घेतलेल्या प्रत्येक उपाययोजनेला यश आले. भाविक, भक्तजनांनीही समितीने आवाहन केल्याप्रमाणे जास्त गर्दी न करता धक्काबुक्की व गोंधळाचे प्रकार टाळले. त्याचप्रमाणे अखेरच्या दिवशी शिरगावात प्रवेश न करण्याचे आवाहनही लोकांनी पाळले. त्यामुळे कळस मंदिरात जात असताना शिरगावात दरवर्षी प्रमाणे मोठी गर्दी झाली नाही. गोंधळाचे प्रकारही टळले. देवस्थान समितीच्या सूचनेला शिरगावात थाटलेल्या दुकानदारांनीही योग्य प्रतिसाद देत आपले दुकाने दिलेल्या वेळेत हटवली. तसेच प्रशासनाने अखेरपर्यंत चांगली कामगिरी बजावली. सर्व वरिष्ठ ते कनिष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी शिरगावात उपस्थित राहून त्यांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगली कामगिरी बजावली, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सर्वांनी सहकार्य केले : राहुल गुप्ता

देवस्थान समितीबरोबर पोलिसांनी चांगली कामगिरी बजावली - पोलीस अधीक्षक शिरगावातील जत्रोत्सवात घडलेल्या प्रकारानंतर जत्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी होण्राया गर्दीवर कोणत्या पद्धतीने नियंत्रण ठेवत अनपेक्षित बाबी घडू नये यासाठी गेले चार दिवस देवस्थान समिती व इतर अधिकारी यांच्याशी चर्चा बैठका घेऊन आखण्यात आलेली योजना अखेर सफल झाली. सर्वांनी बैठकामध्ये ठरविण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणेच काम केले. त्यामुळे अखेरच्या दिवशी होणारी गर्दी नियंत्रणात राहिली व धक्काबुक्की व गोंधळही झाला नाही, असे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article